श्रीगोंदा: क्षुल्लक कारणातून झालेल्या मारहाणीत भाऊसाहेब नामदेव रजपूत (वय 41) यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी महेश किरास चव्हाण याच्यासह इतर दहा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. महेश किरास चव्हाण, शैला महेश चव्हाण, मनसुख विश्रांती चव्हाण, निखिल अनिल शिंदे (रा. आढळगाव), आयुर ईश्वर भोसले (रा. श्रीगोंदा), योगेश युवराज काळे (रा. बिटकेवाडी, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत.
रजपूत यांच्या पत्नी दया भाऊसाहेब रजपूत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रजपूत यांचा मुलगा शुभम 16 जानेवारी रोजी आढळगाव येथील एका टपरीवर मित्रासोबत थांबला होता. तेथे त्यांची चर्चा सुरू असताना आरोपी महेशही जवळच उभा होता. शुभम व त्याच्या मित्राच्या चर्चेत महेश मध्ये मध्ये बोलत होता. त्यावर शुभम ‘तुला विषय काही माहिती नाही. तू मध्ये बोलू नको,’ असे म्हणाला. त्यावर महेशने शुभमला शिवीगाळ व दमदाटी केली. जवळ उभ्या अन्य लोकांनी हा वाद मिटविला. त्यानंतर रात्री दहाच्या दरम्यान घोडके यांच्या घराजवळ येऊन थांबली.
त्यामधून महेश, आयुर, मनसुख, निखिल आदी आले व शुभमला शिवीगाळ करत मारहाण करू लागले. मी व पती भाऊसाहेब त्यांना समजावून लागले. त्याचवेळी पिकअपमधून महेशची पत्नी शैला व इतर लोक आले. शुभम महेशच्या तावडीतून सुटून पळू लागला. सर्व आरोपी त्याच्या मागे धावले. मी व माझे पती भाऊसाहेब मध्ये गेलो, तेव्हा महेशने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने पतीच्या छातीत वार केले. पती कोसळले. त्यावर आरोपी महेश चव्हाण, शैला चव्हाण व इतर आरोपींनी ‘आता तरी एकालाच खाली पाडले आहे. अजून एकाचा मेंदू बाहेर काढणार’ असे म्हणत पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या भाऊसाहेब यांचे पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. बहुतांश आरोपी आढळगाव येथील आहेत.
सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, इतर नऊ संशयित ताब्यात घेतले आहेत. गुन्ह्यात वापरलेली चारचाकीही जप्त केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली. निखिल अनिल शिंदे, प्रथमेश नितीन शिंदे, वैभव रमेश झिंजुर्के या तिघांना अटक केली आहे. कूपवाड (सांगली) येथून योगेश काळे, पप्या भोसले यांना ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
तो फ्लेक्स पंधरा मिनिटात उतरविला
आरोपी महेश चव्हाण याचा मागील आठवड्यात वाढदिवस झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फ्लेक्सवर तालुक्यातील एका बडा समजणाऱ्या नेत्याचा आणि आढळगावच्या पन्नासहून अधिक तरुणांचे फोटो होते. खुनाच्या घटनेनंतर फ्लेक्सवर झळकणाऱ्या काही तरुणांनी धावपळ करत अवघ्या पंधरा मिनिटांत तो फ्लेक्स उतरवून घेतला.