

करंजी : जानेवारीच्या मध्यावर शेतपिकांना पाण्याची गरज असते. त्यामुळे मुळा पाटचारीचे आवर्तन देखील मुळा पाटबंधारे विभागाने सोडले आहे .परंतु रब्बी पिकांच्या पहिल्या आवर्तनालाच पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा वाघोली, कोपरे शिवारांतील मतकर वस्तीजवळ कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याच्या प्रवाहाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पाटबंधारे अधिकाऱ्यांना इतरत्र पाणीप्रवाह वळविण्याच्या अगोदरच मतकरवस्ती, भिसेवस्ती,भाकरे वस्तीवरील शेतकऱ्यांचे ऊस, कांदा पीके अक्षरशः पाण्यात तरंगली. कालवा फुटल्याने जवखेडे येथील शेतकऱ्यांचे 25 हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर वाघोली येथील शेतकऱ्यांचे दहा हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. कोपरे येथील शेतकऱ्यांचे सहा ते सात हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कालवा फुटल्याची माहिती समजताच आमदार मोनिका राजळे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्तीच्या सूचना केल्या.
शुक्रवारी कालवा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चितपणे मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार राजळे यांनी यावेळी दिले. कौशल्या मतकर, घनश्याम मतकर, मुक्ताबाई मतकर, गोविंदा मतकर आदींचे ऊस कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी सरपंच चारुदत्त वाघ, ॲड वैभव आंधळे, पाटबंधारे अधिकारी संदीप शेळके, प्रशांत खर्से, नजीर शेख यांच्यासह जवखेडे, वाघोली, कोपरे ग्रामस्थ उपस्थित होते.