श्रीगोंद्यात तिरंगी लढतीचे संकेत Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Municipal Election: श्रीगोंद्यात तिरंगी लढतीचे संकेत; पोटे यांच्या उमेदवारीला ‘मविआ’ घटक पक्षांचा विरोध

नगराध्यक्ष पदावरून अजित पवार गटात मतभेद; शरद पवार गट व शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी गव्हाणे

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार शुभांगी पोटे व मनोहर पोटे यांच्या नावाला राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) या दोन पक्षांच्या नेत्यांनी थेट विरोध करत पोटे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार गटाकडून पोटे यांना उमेदवारी मिळाल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी तिरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत.(Latest Ahilyanagar News)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजप सोडता कुणाशी आघाडी करायची याबाबत त्या त्या भागातील नेत्यांना अधिकार दिले आहेत. श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक ही राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध भाजप अशीच रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) यांनी श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, साजन पाचपुते यांची एकत्र बैठक पार पडली. मात्र अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी मनोहर पोटे, शुभांगी पोटे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने या उमेदवारीला शरद पवार गटाचे नेते बाबासाहेब भोस व शिवसेना(उबाठा) गटाच्या नेत्यांनी थेट विरोध दर्शविला आहे. पोटे यांच्याऐवजी अन्य कुणालाही उमेदवारी द्या, अशी भूमिका या दोन नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मनोहर पोटे यांना उमेदवारी देऊ नका असेही सांगण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, रविवारी (दि. 2) अजित पवार गटाच्या नेत्यांनी बैठक घेऊन चार संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यामध्ये घनश्याम शेलार, सुधीर खेडकर, कांतिलाल कोथिंबीरे, मनोहर पोटे यांची नावे असल्याचे समजते. ही चार नावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहेत. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल.

शुभांगी पोटे व मनोहर पोटे यांनी मागील वेळी निवडणूक लढवताना सगळ्या नेत्यांचा आधार घेत सत्ता काबीज केली; मात्र त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी या नेत्यांना बेदखल करत पालिकेत स्वतःचा सवता सुभा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पोटे यांच्यावर केला जात आहे. आता निवडणूक लागल्याने पोटे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

नगरपालिकेची भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी निवडणूक होईल, अशेी शक्यता वर्तविला जात असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते बाबासाहेब भोस यांनी मनोहर पोटे यांच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेसला सोबत घेऊन नगराध्यक्ष पदासाठी तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

..तर आम्ही तिसरा उमेदवार उतरवू ?: भोस

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले, की नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी घटक पक्षाच्या नेत्यांना जो उमेदवार मान्य असेल त्यालाच उमेदवारी दिली तर आम्ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहोत. आम्हाला मान्य नसलेली उमेदवारी लादण्याची अजित पवार गटाच्या नेत्यांची भूमिका असेल, तर आम्ही या निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणार आहोत. आमची तिसरा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी आहे.

जगताप-नागवडे यांची भूमिका महत्त्वाची

विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले राहुल जगताप, राजेंद्र नागवडे हे आता अजित पवार यांच्या पक्षात आहेत. दोघांनीही एकत्र काम करण्याची भूमिका व्यक्त केली आहे. श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT