श्रीगोंदा: लोणी व्यंकनाथ येथे वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू झाला. दोषी अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांविरोधात रात्रीत गुन्हे दाखल झाले. मात्र, ज्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप मुलींचा जीव गेला त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? की फक्त कागदी घोडे नाचवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोणी व्यंकनाथ येथे तलावात पडून दोन मुली अत्यवस्थ झाल्या होत्या. त्यांना वेळेवर रुग्णवाहिका परिणामी उपचार न मिळाल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे लोकांचा उद्रेक होणे स्वाभाविक होते. त्यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. अर्थात यापूर्वीही गावकऱ्यांना असेच अनुभव असल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यात सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, स्मितल वाबळे, जहीर जकाते यांनी सहभाग घेत आलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची बोलण्याची पद्धत आंदोलनकर्त्यांना वेगळ्या प्रकारची वाटल्याने त्यांचेही काही काळ ऐकून घेतले नाही. पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर हे आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात रोखून धरल्याने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आता संबंधिताने स्वतःहून गुन्हा दाखल केला की त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी कुणाचा दबाव होता हा संशोधनाचा विषय ठरेल. बरं त्यात फक्त तीनच लोकांची नावे टाकण्यात आली. इतर पंधरा लोक असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
एका रात्रीत आंदोलन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, ज्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप मुलींचा जीव गेला त्यांच्यावर कारवाई कधी होणार की वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मंगळवारपासून महिलांचे प्राणांतिक उपोषण
लोणी व्यंकनाथ येथील आनंदी अनिल कांडेकर, वीरा प्रवीण कांडेकर या चिमुरड्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे व डॉ. मुळे यांना पाठीशी घालणाऱ्या अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी ज्योती मांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैला डांगे यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथील महिला मंगळवार (दि. २८)पासून श्री व्यंकनाथ महाराज मंदिरात प्राणांतिक उपोषण करणार आहेत. याबाबत लोणी व्यंकनाथच्या सरपंच मनीषा नाहाटा व उपसरपंच चंद्रकला पवार यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले आहे.
अधिकाऱ्यांना अभय का दिले?
लोणी व्यंकनाथ येथील आनंदी कांडेकर व वीरा कांडेकर या तीन वर्षीय बालिका शेततळ्यात पडल्या. पुढील उपचारासाठी त्यांना दौंडला नेणेकामी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. त्यांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करून हे प्रकरण दडपण्याचे पाप केले आहे. आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. वैद्यकीय सेवा देताना हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल सरपंच मनीषा बाळासाहेब नाहटा यांनी विचारला आहे.
नाहाटांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्ह्यात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे आंदोलन करता येणार नाही, म्हणून महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा व सरपंच मनीषा यांना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी प्रतिबंधित नोटीस बजावली आहे. त्यामुळे नाहाटा दापत्य आंदोलन करणार का, असा प्रश्न आहे.
आंदोलन होणारच
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नोटिसा बजावून सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे. जोपर्यंत या वैद्यकीय अधिकाऱ्यावर शासन कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.