

पारनेर: कुठलेही प्रश्न संवादाने सुटतात, चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत. माझी २२ उपोषणे झाली; पण कधी हिंसा केली नाही. राजीनाम्यानंतर कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मानत नाही. मात्र, समाजाच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते करत राहा, असे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. नीट पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला.
त्यावर हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नैतिक जबाबदारी म्हणून प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरसह देशातील विविध ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे.
हिंसेचा मार्ग न अवलंबता प्रश्न संवादाने सुटतात, चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत, असे ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी म्हटले आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन केले होते.
आंदोलनाआधी त्यांनी सरकारकडून दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, अशी भूमिका बॅनरमार्फत स्पष्ट केली होती. तसेच नीट पेपरफुटी, बेरोजगारी, भरती प्रक्रियांवरून चिंता व्यक्त करत सरकारने संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.