Shrigonda Cycle Club Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Cycle Club: श्रीगोंद्यात सायकल चळवळीचा विस्तार; 50 हून अधिक सायकलस्वार सक्रिय

पंढरपूर ते जेजुरीपर्यंत लांब पल्ल्याच्या सायकल वाऱ्या; महिलांचाही मोठा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी गव्हाणे

श्रीगोंदा: शहरात 2019 मध्ये काही तरुणांनी मिळून लावलेले सायकल चळवळीचे रोपटे वाढू लागले असून गेल्या सात वर्षांत पन्नासहून अधिक सायकलस्वार त्यात सक्रिय झाले आहेत. सायकल संघटनांच्या माध्यमातून बीड, पंढरपूर, अक्कलकोट, वाघोली, जेजुरी, पारनेर, अहिल्यानगर अशा लांब पल्ल््याच्या सायकलवाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत.

श्रीगोंदा तालुका सायकल क्लबचे अध्यक्ष नवनाथ दरेकर, संपत ईधाटे, अमोल मखरे या तीन तरुणांनी 2019 मध्ये पंढरपूर सायकलवारी केली. त्यानंतर शहरासह तालुक्यात हळूहळू सायकलकडे लोकांचा कल वाढू लागला. नियमित सायकल चालवणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. श्रीगोंदा शहर, आढळगाव, बेलवंडी, पारगाव, काष्टी येथील तरुणांनी नित्य सायकल चालविण्यास सुरुवात करत सायकल चळवळीस हातभार लावला.

नवनाथ दरेकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे, संपत ईधाटे, संकेत गांजुरे यांनी एकत्र येऊन श्रीगोंदा तालुका सायकल क्लबची स्थापना केली. त्याचबरोबर विजया लंके यांनी शिवशंभू सायकल रायडर्स नावाने संघटना स्थापन करून शहरातील महिलांची टीम तयार केली. या दोन्ही संघटना दर वर्षी पंढरपूर सायकलवारी करतात. या लांब पल्ल्याच्या सायकलवारीमध्ये महिलाही सहभागी होत असतात.दिवसेंदिवस ही सायकल चळवळ अधिकाधिक व्यापक होण्याची गरज व्यक्त होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील सायकल चळवळ पुढे नेण्यात अग्निपंख फाऊंडेशनचा मोठा वाटा आहे.सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सलाम करण्यासाठी सायकल यात्रा आयोजित केल्या जातात.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही श्रीगोंदा ते बारामती अशा सायकलयात्रेची तयारी करत आहोत. श्रीगोंदा तालुक्यात सायकल चळवळ जास्तीत व्यापक व्हावी यासाठी आमचे नित्य प्रयत्न असतात.
नवनाथ दरेकर, अध्यक्ष, श्रीगोंदा तालुका सायकल क्लब
कोरोना काळापासून आम्ही सायकल चालवत आहोत. वर्षात लांब पल्ल्याच्या पाचहून अधिक सायकलवाऱ्या होतात. महिलाही यात सहभागी होतात ही महत्त्वाची बाब आहे. सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्यासह पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
विजया लंके, अध्यक्ष, शिवशंभू सायकल रायडर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT