कोल्हार : सलग सुट्ट्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूरकडे जाणार्या साईभक्तांच्या वाहनांची गर्दी दाटल्याने आज शनिवारी पुन्हा एकदा कोल्हार येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना एसटी महामंडळाची लालपरी राज्य मार्ग लगत असलेल्या खड्ड्यात व दलदलीत जाऊन पलटी होता होता राहिली. चालकाच्या प्रसंगावधानाने मात्र सर्व प्रवासी बालबाल बचावले. (Ahilyanagar News Update)
सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होती.वाहतूक कोंडीमुळे कोल्हार-लोणी रोडवर तसेच नगर-मनमाड राज्य मार्गावर दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मनमाड डेपोची बस (एमएच 14 एमएच 2695) मनमाड-पुणे बस वाहतूक कोंडी असल्याने कोंडीत अडकली.
गर्दीतील वाहनांना ओव्हरटेक करीत बस चालक वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच येथील न्यू इंग्लिश स्कूल जवळ असलेल्या कच्च्या रस्त्यावरील दलदलीत व खड्ड्यात चाके रुतल्याने फसली. एका बाजुला कलंडल्याने बस पलटी होता होता राहिली.
या प्रकारामुळे बसमधील प्रवासी घाबरून गेले. खड्ड्यात रुतून बसलेली ही बस क्रेनने एक तासानंतर बाहेर काढण्यात आली. या प्रवाशांना उतरवून दुसर्या बसमध्ये पाठवण्यात आले. दुसरी बसही वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे प्रवासी हैराण झाले.
शनिवारी कोल्हारमध्ये जोरदार पावसाने सुरुवात केली. त्यातच वाहतूक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी वाट मोकळी दिसेल त्यावरून छोटी मोठी वाहने व दुचाकीस्वार मार्गक्रमण करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. शनिवारी दुपारी बरसलेल्या जोरदार पावसामुळे सकल भागात पाणी पाणी झाले.
दलदलीमुळे अनेक मोटर सायकलस्वार घसरून छोटे-मोठे अपघातही झाले. लोणीचे़ हवालदार कल्याण काळे, सुनील फुलारी, बाबळेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक ठोंबरे बाबळेश्वर, पोलिस मित्र रामराजे गायकवाड यांनी भर पावसात वाहतूक सुरळीत केली.