श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री द्वारकामाईमध्ये सुरू असलेल्या 'श्री साईसच्चरित' या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची भक्तिभावात सांगता झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीत श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी वीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी साईबाबांची प्रतिमा हातात घेऊन सहभाग घेतला.
१५ ऑक्टोबर १९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला बाबांची पुण्यतिथी केली जाते. परंपरेनुसार पूर्वजांचे जसे श्राद्ध केले जाते, तसेच साधू-संतांच्या पुण्यतिथीदिनी 'आराधना विधी' करण्याची प्रथा आहे. त्यानुसार उत्सवाच्या मुख्य दिवशी दुपारी साई मंदिरात साई आराधना विधी विधिवत पार पडेल.
दसऱ्यानिमित्त होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन आज रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त गुजरात येथील दानशुर साईभक्त श्रीमती ममता सतिष कपिलेश्वरकर यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.