एकरूखे: श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ४ जवळ रविवारी रात्री शेजारतीच्या आधी व्यवसायाच्या जागेच्या वादातून जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय २९, रा. बाजारतळ, शिर्डी) या फळविक्रेत्या महिलेचा धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जयश्री या मंदिर परिसराजवळ काकडी-कैरी विकत असत. संशयित आरोपी अंजली खंडीझोड (वय २२) फोटो विकायची. त्यांच्यात गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी व्यवसायासाठी बसण्यावरून वाद होता. रविवारी अंजलीच्या सांगण्यावरून तिची मैत्रीण फिजा उर्फ नोझिया लुकमान पटेल (वय २१, दोघी रा. कालिकानगर) ही जयश्रीसोबत वाद घालायला पुढे आली.
जयश्री यांच्याकडे ग्राहक असल्याने फिजाने ती एकटी होण्याची वाट पाहिली. फिजाने अंजलीला फोन करून बोलावून घेतले. दरम्यान, जयश्री एकटी दिसताच फिजाने तिच्यावर चाकूने वार केले. मध्यस्थी करायला आलेल्या मैत्रिणींनाही त्यांनी दमदाटी केली असे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक अमोल भारती, निरीक्षक रणजीत गलांडे आणि उपनिरीक्षक सागर काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रक्तबंबाळ जयश्री यांना श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत जयश्री यांच्यामागे दोन लहान मुले आहेत; तर आरोपी अंजलीला एक मुलगा असून फिजाचे ४-५ महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. मृत महिलेचे पती साईनाथ क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण घटना संस्थानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात येणार: राधाकृष्ण विखे
पुरुषांप्रमाणे महिलादेखील गुन्हेगारी वृत्तीकडे वळत आहे. यामुळे शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात येणार असून परराज्यातील लोकांना जागा विकताना किंवा भाडेतत्त्वावर देताना त्यांची कौटुंबिक माहिती घेणे गरजेचे आहे. शिर्डीतील अमली पदार्थ विक्री किंवा हॉटेलवर चालणारे अवैध व्यवसाय यावर आपण कारवाई केली आहे; परंतु जनतेने देखील सतर्क राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर केला जातो. याबाबत बोलताना ते म्हणाले, की प्रशासनाने आता गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली असून जोपर्यंत जिल्ह्यात गुन्हेगारांचा बीमोड होत नाही तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.