नगर: ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या नावाने शिर्डीत सुमारे तीनशे कोटींची फसवणूक करणार्या भूपेंद्र राजाराम साबळे याच्याकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही दीड कोटी रुपये ऑनलाईन उकळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच नाशिकला पलायन करणार्या साबळे यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते; मात्र दीड कोटी मिळाल्याने त्यास सोडून दिल्याची कबुली दस्तुरखुद्द साबळे यानेच दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपनिरीक्षकांसह चौघांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. (Latest Ahilyanagar News)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार छबूराव धाकराव, हवालदार मनोहर सीताराम गोसावी, बापुसाहेब रावसाहेब फोलाणे आणि गणेश प्रभाकर भिंगारदे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
कंपनीच्या संचालकांनी चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा राहाता पोलिसात दाखल झाला. त्यानंतर शिर्डीतही असाच गुन्हा दाखल झाला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शरद गोर्डे करत आहेत.
गोर्डे यांनी अटकेतील आरोपी भूपेंद्र राजाराम साबळे याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. शिर्डीत जमा केलेले जवळपास 300 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. मार्केटच्या चढ-उतारामध्ये घाटा झाल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकलो नसल्याची कबुली साबळे याने दिली. याच तपासात त्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही दीड कोटी दिल्याची कबुली दिली.
आलिशान फॉर्च्युनर कारने नाशिककडे पसार होणार्या साबळे यास निलंबित केलेल्या पोलिसांच्या पथकाने 15 जानेवारी 2025 रोजी लोणीजवळ अडवले. साबळेसोबत त्याचे दोन भाऊ व मित्र असे चौघे होते. ‘तुझ्याकडे कोणतेही आरबीआयचे लायसन्स नसताना, जनतेकडून पैसे गोळा करून फसवणूक करतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,’ असा दम धाकरावसह इतर पोलिसांनी दिला.
‘माइयावर कोणतीही कारवाई करू नका, मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही, मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका,’ अशी विनवणी साबळेने केली. यातून सुटायचे असेल तर दीड कोटी रुपये नगद दे,’ अशी मागणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. नगद पैसे देऊ शकत नसल्याचे उत्तर येताच पोलिस पथकाने साबळेसह चौघांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले.
तेथे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी ऑनलाईन 1 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली. विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा मागणीप्रमाणे सांगितलेल्या अकाउंटवर साबळे याने ऑनलाईन 1 कोटी 50 लाख रुपये ट्रान्सफर केले. हा कबुलीजबाब मिळताच तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक गोर्डे यांनी तसा अहवाल पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिला.
चौघा पोलिसांनी चौकशी सुरू
गुन्हे शाखेच्या अधिकार्यांसह पोलिसांनी गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी समोर येताच चौघांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी काढले. गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात पोलिसांच्या गैरकृत्याची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात येऊन चौकशी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शिर्डी येथील फसवणूक प्रकरणाच्या चौकशीत आरोपी साबळेकडून पोलिस उपनिरीक्षक धाकराव व इतरांनी दीड कोटी ऑनलाईन घेतल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकार्यासह तीन पोलिस कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सविस्तर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची नेमणूक केली आहे.- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक