नगर: ऑफिसबॉय नीराज जाधव विरोधात शिर्डीत दाखल गुन्ह्यात पोलिसांवर दबाव आणून ‘तो’ पेन ड्राईव्ह हस्तगत करण्याचा कट 6 मार्चला शिर्डीत शिजला गेला. त्या बैठकीसाठी मुंबईतून तीन आयएएस अधिकाऱ्यांसह भोदूबाबा अशोक खरातही शिर्डीत होता. मात्र शिर्डी पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत बसेल तेच केले. सांगूनही शिर्डी पोलिस ऐकत नाही म्हटल्यावर तपासाचे सूत्र हलविणाऱ्या अपर पोलिस अधीक्षकांविरोधातच गुन्हा दाखल करण्याचा बी प्लॅनही झाला. पण, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच गुन्हा दाखल होवून भोंदूबाबा खरातला बेड्या ठोकल्या गेल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
शिर्डीत नीरज जाधव विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे एएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याच मार्गदर्शन, नेतृत्वात सुरू होता. नीरजकडून वाघचौरे यांना ‘तो’ पेन ड्राईव्ह हाती लागला होता. तो मिळविण्यासाठी भोंदू खरातने दबावतंत्र वापरले, पण त्याचा उपयोग होत नव्हता. मग वाघचौरे यांनी जबाब घेतलेल्या महिलेपैंकी एकीला हाताशी धरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा बी प्लॅन आखला गेला. त्याचाच भाग म्हणून वाघचौरे यांना महिला आयोगाने नोटीस धाडली होती. सोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून भोंदू खरातने एएसपी वाघचौरे यांना अडचणीत आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला, पण त्या प्लॅनची अंमलबजावणी होण्यापूर्वीच मुंबईतून सूत्रे हलली अन् नाशिकला गुन्हा दाखल होताच लागोलाग खरातला बेड्या ठोकल्या गेल्या.
नाशिकला गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘खरात फाइल्स’चा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात सुरू आहे. या तपासात दररोज अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिर्डीतील एका गुन्ह्यात नीरज जाधव विरोधात तपास करत असताना शिर्डी पोलिसांच्या हाती ‘तो’ पेन ड्राईव्ह लागला अन् खरातच्या काळ्या कृत्याचे बिंग फुटले. शिर्डी पोलिस तपासाच्या दिशेने काय करतात, याची इत्यंभूत माहिती शिर्डीतूनच भोंदू खरातपर्यत पोहचत होती. त्यानुसार तो सूत्र हलवित होता. नीरजकडून शिर्डी पोलिसांना मिळालेला पेन ड्राईव्ह काही करून मिळवायाचा अन् ते प्रकरण रफादफा करण्याचा ए प्लॅन खरातने आखला. त्यासाठी मुंबईतून तीन आयएएस अधिकाऱ्यांना बोलावले गेले. मिरगाव येथे काही काळ बैठक केल्यानंतर एक अधिकारी नाशिककडे परतला, तो पुढे जाणार होता. तर दोन अधिकाऱ्यांना घेऊन भोंदू खरात शिर्डीत आला. शिर्डीत दाखल गुन्ह्यात नीरजला गुंतवयाचे अन् तो पेन ड्राईव्ह घेवून रफादफा करण्याचा कट शिर्डीतील बैठकीत शिजला. त्यासाठीच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबावाचा ‘प्रयोग’ केल्याचे ऐकिवात आहे. मात्र शिर्डी पोलिसांनी त्याला दाद दिली नाही.
शिर्डी पोलिसांनी ज्या ज्या महिलांचे जबाब घेतले, त्यातील एक महिलेला हाताशी धरून तपासी अधिकारी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे विरोधातच गुन्हा दाखल करण्याचा बी प्लॅन तयार केला गेला. मात्र मुंबईत वरिष्ठांकडे धाव घेत वाघचौरे यांनी खरात फाइल्सची इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली झाल्या अन् त्याच रात्री भोंदूबाबा खरातला बेड्याही ठोकल्या गेल्या.
शिर्डीतील प्रॉपर्टीचे मालक पोलिसांत
भोंदू खरातची निघोजला 4 एकर, निमगाव कोऱ्हाळेत सव्वा एकर आणि शिर्डीत 28 गुंठे अशा प्रॉपर्टीचे मायाजाल पसरविले आहे.यातील एका प्रॉपर्टीचा मूळ मालक पोलिसांत गेला आहे. भोंदू खरातने जमीन हडप केल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र तथ्य आहे की नाही? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मूळ मालकाच्या दाव्यात तथ्य आढळून आल्यास शिर्डीत भोंदू खरात विरोधात नवा फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
40 चे 58 झाले कसे; की नवा पेन ड्राईव्ह?
शिर्डी पोलिसांना नीरज जाधवकडून मिळालेल्या पेन ड्राईव्हमध्ये तसले 40 व्हिडीओ होते. नाशिक पोलिसांच्या मते पेन ड्राईव्हमध्ये 58 तसले व्हिडीओ आहे. 40 व्हिडीओचे 58 झाले कसे? की नाशिक पोलिसांना आणखी एक पेन ड्राईव्ह मिळाला. त्यात ते 58 आणि शिर्डी पोलिसांना मिळालेले 40 असे 98 तसले व्हिडीओ असण्याची दुसरी शक्यताही वर्तविली जात आहे.
श्रीरामपूरच्या तथाकथित बाबाचे खरात कनेक्शन
भोंदूबाबा अशोक खरातच्या व्हायरल व्हिडीओत श्रीरामपूर तालुक्यातील तथाकथित बाबांची उपस्थिती समोर आल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. हा बाबाच काय तर त्या गावातील तरुणही भोंदू खरातचे अंधभक्त असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.
नाशिकचा भोंदू खरात याचे कारनामे असलेले व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओत श्रीरामपूर तालुक्यातील तथाकथित बाबाची उपस्थिती दिसून येत असल्याची चर्चा आहे. अशोक खरातचे थेट श्रीरामपूर कनेक्शन समोर आल्याने भोंदू खरातचे अंधभक्त कोण? याविषयी तर्कविर्तक लावले जात आहे. संतप्त त्या गावातील नागरिकांनी तथाकथित बाबाचीही चौकशी करावी, अशी मागणी माध्यमांजवळ केली आहे. विशेष तपास पथकाने श्रीरामपूर कनेक्शनची चौकशी केल्यास आणखी माहिती पुढे येऊ शकते.
पोलिसांनीही बदलवला प्लॅन
शिर्डी पोलिसांच्या हाती आलेल्या पेन ड्राईव्हमधून खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड झाला. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे नियोजन मुंबईत गेले केले. मात्र त्यापूर्वीच खरातने पोलिसांवर दबावतंत्र अवलंबित गुन्ह रफदफासाठीचे तंत्र मंत्र सुरू केले. गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला तर श्रीरामपूरचे एएसपी सोमनाथ वाघचौरे देखील भोंदूच्या खोट्या गुन्ह्याच्या तंत्रमंत्रात अडकण्याची भिती होती. ही परिस्थिती लक्षात येताच मुंबईतून सूत्रे हलली आणि पोलिसांनी प्लॅन बदल करत अधिवेशन संपण्याची वाट न पाहता गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.