Accident Pudhari
अहिल्यानगर

Shevgaon Paithan Road Accident: दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तीन युवकांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; खानापूरवर शोककळा

शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटणनजीक भीषण अपघात; रस्त्याचे संथ काम आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचा धोका

पुढारी वृत्तसेवा

शेवगाव: दिवाळीच्या खरेदीसाठी शेवगावकडे दुचाकीवरून निघालेल्या खानापूर येथील तीन युवकांचा मालवाहू ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटणनजीक शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात घडला. या घटनेने खानापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमर रवींद्र जगधने (वय १७), ओंकार भाऊसाहेब जगधने (वय १९) आणि रोहित रमेश धनुरे (वय १७, सर्व रा. खानापूर) हे तिघे दुचाकी (एमएच १६ डीवाय ३८९९)वरून दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी शेवगावकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (एमएच १५ एचएच ३४६५) दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.

ग्रामस्थांनी तिघांना तातडीने शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातातील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रस्त्याच्या संथ कामामुळे अपघातांना निमंत्रण

शेवगाव-पैठण रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, ते अत्यंत संथ गतीने होत आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण असताना दिशादर्शक व सूचना फलकही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या स्थितीचा अंदाज येत नाही. त्यातच सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने गंगामाई, केदारेश्वर, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर आणि आदि कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊसगाड्या, ट्रॅक्टर व मालवाहू वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ आहे.

संथ गतीने सुरू असलेले रस्त्याचे काम आणि अवजड वाहनांची गर्दी यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स व प्रकाशव्यवस्था करावी आणि ऊस वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT