शेवगाव: तालुक्यातील जलसाठे आणि सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे तालुक्यातील ७४८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
वडुले बुद्रुक येथील नंदिनी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्याचा १५० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. वाघोली येथील वृद्धा (येर्डा) नदीवरील बंधाऱ्यासाठी १ कोटी रुपये मंजूर असून, १३४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सामनगाव येथील ढोरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, १८६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ढोरजळगाव येथील ढोरा नदीवरील बंधाऱ्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर असून, ७२ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. तर मळेगाव शे. येथील ढोरा नदीवरील बंधाऱ्यासाठीही १ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असून, १०६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा मिळणार आहे.
मंजूर निधीतून बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे इलिप्टिकल बंधाऱ्यात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे जलसाठवण क्षमता आणि बंधाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊन परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात करण्यात येणार असल्याचेही आ. राजळे यांनी स्पष्ट केले. या कामांमुळे शेवगाव तालुक्यातील जलसंधारण आणि सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, आगामी काळात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
या निधीला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल आ. मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तसेच जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे आणि जलसाठे सक्षम व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर निधीतून कोल्हापूर बंधाऱ्यांची दुरुस्ती, तसेच आवश्यक ठिकाणी त्यांचे इलिप्टिकल बंधाऱ्यात रूपांतर करण्यात येणार आहे. या कामांचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल.आ. मोनिका राजळे