Shevgaon Election Pudha
अहिल्यानगर

Shevgaon Election: जनशक्ती आणि शिवशक्तीच्या एकीने शेवगावात भगवा फडकणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास, शहरासाठी 'या' मोठ्या प्रकल्पांची घोषणा.

शिवाजीराव काकडे यांचा 'जनशक्ती मंच' शिवसेनेत विलीन; रिंगरोड, एमआयडीसीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार, शिंदे यांचे सभेतून तत्काळ आश्वासन!

पुढारी वृत्तसेवा

शेवगाव : शिवाजीराव काकडे यांचा जनशक्ती मंच शिवसेनेत विलीन झाल्याने एकीच्या जोरावर शेवगाव नगरपरीषदेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया अरुण मुंडे यांना संधी देत शेवगावकरांनी परिवर्तन करावे, असे आवाहन मंत्री शिंदे यांनी केले.

शेवगाव येथील शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंडे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आ. विठ्ठलराव लंघे, आ. विलास भुमरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, अरूण मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ कुसाळकर, बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, पप्पू केदार. साईनाथ आधाट उपस्थित होते. जनशक्तीचे नेते ॲड. शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह विविध गाावचे सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काकडे कुटुंबाने विना अट विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा जनशक्ती आता शिवसेनेत विलीन झाला आहे. जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकीत शेवगाव नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल.

परिवर्तन घडवा आणि शहराच्या विकासासाठी शिवसेनेला खंबीर साथ द्या. शेवगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया अरुण मुंडे यांना खंबीर साथ द्यावी, शेवगावातील घराणेशाहीला योग्य धडा शिकवून नवे परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कायम राहणार असून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठा निधी देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा संकल्पही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मांडला.

बोलतो ते करून दाखवतो

शेवगावकरांना संबोधित करत असताना सभेतूनच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सावंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून तत्काळ निधी आणि प्रकल्पांसाठी आश्वासनही मिळवले. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मूलभूत समस्या वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यांचे निराकरण करून विकासाला गती मिळावी तसेच शेवगावच्या सर्वांगिन विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंडे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणणारच.
हर्षदा काकडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT