ढोरजळगाव : भय इथले संपत नाही, या उक्तीप्रमाणे शेवगावच्या पश्चिम भागात बिबट्याची दहशत पसरली असून, रात्रीबरोबरच दिवसादेखील बिबट्याचे दर्शन व हल्ले होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बंधाऱ्यांच्या मालिकांमुळे बागायती क्षेत्र वाढले असून, दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात पाणलोट बंधाऱ्यांमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उसाचे क्षेत्र वाढल्याने जंगली प्राणी असणाऱ्या बिबट्यालाही लपण्यासाठी जागा यामुळे मिळाली.
प्रजनन होऊन बिबट्याच्या मादीने अनेक पिले जन्माला घातल्याने ती पिले वर्षभरात मोठी होऊन बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु गेल्या महिन्यापासून ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तुटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आश्रयासाठी उसात लपलेले बिबटे मानवी वस्त्यांमध्ये येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत.
ढोरजळगाव परिसरातील गरडवाडी येथील अरुण गरड यांची शेळी, संजय गर्जे यांची गावरान कालवड, पंढरीनाथ गरड यांचे पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले. आखतवाडे परिसरातील रामगड येथील बाळासाहेब सोनवणे यांच्या फार्म हाऊस शेजारी राहणाऱ्या गणेश कुटे यांच्या शेतातील घरी सायंकाळी 7.30च्या सुमारास कुटे हे गाईची धार काढत असताना घरासमोरील बसलेल्या दोन पाळीव कुत्र्यांपैकी एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला फरपटत उसात ओढत नेऊन कुत्र्याचा फडशा पाडला. भातकुडगाव मावलाई रोड येथे कराड वस्तीवर बिबट्याची मादी व तिचा बछडा यांचा दिवसा संचार शेतकऱ्यांना आढळून आला असून, वडुले खुर्द येथे आव्हाड यांच्या शेळ्या बिबट्याने मारून टाकल्या आहेत.
ढोरजळगाव येथे जयदीप लबडे व बाळासाहेब लबडे या बंधूंच्या घरी बिबट्याने दर्शन दिले. आव्हाने व बऱ्हाणपूर परिसरात अनेक शेतकऱ्यांना बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचे हल्ले सुरू असताना मात्र वन विभाग पिंजरे व कर्मचारी कमी असल्याचे कारण देत असून, मृत पाळीव प्राण्यांचे अवशेष मिळाल्यास पंचनामे होत आहेत. मात्र, अवशेष न मिळाल्यास शेतकऱ्यांना पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळत नाही. ग्रामीण भागात बिबट्याच्या भीतीने रात्री लवकरच सामसूम पहावयास मिळत आहे. प्रशासनाने व वन विभागाने याची लवकर दखल घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत असून, आणखी काही घटना घडल्यास नागरिकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे.
सध्या कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून, उंच वाढलेल्या कपाशीमध्ये शिरून कापूस वेचणी करावी लागत असल्याने शेतकरी व शेतमजूरही भयभीत झाले आहे. ऊसतोड मजुरांबरोबर त्यांची लहान मुले असल्याने तेही जीव मुठीत घेऊन ऊस तोडत आहेत. लहान मुलांना एकटे न सोडता शाळेत सोडविण्यासाठी स्वतः पालक येत आहेत.