नगर: शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील ऊसाच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून काही तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांच्या मुसक्या आवळल्या. शिकारीच्या वादातून दोन मित्रांनीच हा घातपात केल्याचे तपासात समोर आले आहे.
विजय चंदर किडमिचे, अरुण लाला उपदे (दोघे रा. रामनगर,शेवगाव) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. आकाश लक्ष्मण किडमिचे असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Ahilyanagar News)
ठाकूर पिंपळगाव येथे 22 वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृत्यू संशयास्पद असल्याने अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर मृत आकाश लक्ष्मण किडमिचे (वय 20 वर्षे, रा.रामनगर,शेवगाव) असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय घोडके, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, प्रमोद जाधव व उमाकांत गावडे यांनी समांतर तपास करून खूनाला वाचा फोडली.
आकाश सोबत कोण कोण गेले होते, त्या ठिकाणी पत्ते खेळणारे कोण होते, शेवटच्या लोकेशनला आकाश सोबत कोण होते, याबाबतची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यात शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून आकाशचा खून केल्याची धक्कादायक माहिती हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.