सोनई: शनिशिंगणापूर देवस्थान ॲप गैरव्यवहारासह विविध कारणांनी गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. त्यातच सध्या देवस्थानचा कारभार विभागीय आयुक्तांच्या हाती आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षात मंदिरात मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्री नवीन विश्वस्तांची निवड करतील की विभागीय आयुक्तांकडेच कारभार ठेवतील याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
(स्व) बाबूराव बानकर यांनी गावातील 4 ग्रामस्थांना घेऊन 1963 साली शिंगणापूर देवस्थानची स्थापना केली. गेल्या 62 वर्षांपासून प्रत्येक 5 वर्षांनी धर्मादाय आयुक्त गावातील मूळ रहिवाशांना विश्वस्त म्हणून निवड करत होते. नवीन 2018 च्या कायद्यानुसार राज्यातील शनिभक्तांची विश्वस्त म्हणून नेमणूक होणार असल्याने अनेकांनी कपाळाला बाशिंग बांधले आहे.
विश्वस्त समिती बरखास्त झाल्यानंतर शनीमंदिरात अधिकारीराज सुरू झाले व भाविकांना सुविधा, पारदर्शी टेंडर, कर्मचाऱ्यांना शिस्त तसेच गेल्या अनेक वर्षांचा कमिशन एजंटांचा प्रश्न विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एका महिन्यात निकाली काढला.
दरम्यान, नवीन विश्वस्त समिती 31 मार्च 2026 च्या आधी नेमली जाईल असे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यामुळे विश्वस्त होऊ इच्छिणाऱ्यांनी मुंबईला फेऱ्या केल्या. आपापल्या नेत्यांकडे चकरा मारल्या. नगर जिल्हातील विशेषतः नेवासा तालुक्यातील अनेकांनी त्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी संबधित लोकांना या विश्वस्त मंडळात स्थान मिळणार असल्याचे; मात्र अध्यक्षपद शिवसेनेकडे की भाजपकडे यावर तोडगा निघत नसल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी पारदर्शक कामाला प्राधान्य देत असतात. नाशिक येथे होणाऱ्या कुंभच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक शनिदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नवीन समिती नेमणार की विभागीय आयुक्तांकडेच कारभार ठेवणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
पालकमंत्री व आमदाराकडे अनेकांचे साकडे
विश्वस्त होण्यासाठी राज्यातील व जिल्ह्यातील अनेकांनी तयारी सुरू केली आहे. सर्वांत जास्त इच्छुक नेवासा तालुक्यात असून कुणी आमदाराकडे तर कुणी पालकमंत्री यांच्याकडे चकरा मारत आहेत. चांगल्या व प्रामाणिक लोकाना संधी मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.