Shani Shingnapur Pudhari
अहिल्यानगर

Shani Shingnapur Crowd: शनिशिंगणापूरमध्ये 9 लाख भाविकांची गर्दी; वाहतूक कोंडीमुळे नियोजन कोलमडले

शनी जयंती–अमावस्या दुर्मिळ योगामुळे प्रचंड गर्दी; उन्हाचा तडाखा, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे भाविकांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

सोनई: तेरा वर्षानंतर आलेला शनी जयंती व अमावस्या या दुर्मिळ योगाची पर्वणी साधत सुमारे 9 लाख भाविक शनीचरणी लीन झाले. भर उन्हाच्या कडाक्यात सोनई, घोडेगावात भाविक वाहतूक कोंडीत अडकून पडले. अपेक्षेपेक्षा जास्त भविकांच्या गर्दीने प्रशासनाने नियोजन अक्षरश: कोलमडून पडल्याचे दिसले.

शनिजयंती व अमावस्या असल्याने पहाटे पासूनच शनिदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शिंगणापूरपासुन तीन किलोमीटर अंतरावर वाहनतळ व्यवस्था असल्याने भाविकांना उन्हाचा तडाखा जाणवला. शनीचौथऱ्यास फुलांची आकर्षत सजावटीसोबतच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी 11.30 वाजता श्री क्षेत्र काशी, आयोध्या, प्रयागराज येथुन मोटारसायकल कावड यात्रेचे आगमन झाले. गावातून काशी व प्रवरासंगम येथून आलेल्या कावडीची मिरवणूक काढण्यात आली.

पहाटेची महाआरती माजी खा. चंद्रकांत खैरे, पंकज कुमार यांच्या हस्ते व दुपारी बारा वाजता मुर्तीस वस्र व अलंकार घातले राकेश कुमार, सौरभ बोरा, सौरभ गाडगीळ व कावडीधारकांच्या हस्ते पुजन व मध्यान आरतीचा सोहळा झाला. देवस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी भाविकांचे स्वागत केले.

शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर परिसरात गर्दीचा ओघ सुरू झाला. दुपारी 12 च्या आरतीनंतर दर्शन पथ पूर्ण भरल्याने देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यानी स्वत: सुमारे 3 तास दर्शन पथ व मूर्तीसमोरील भागात लक्ष ठेऊन सूचना केल्या.

भाविकांच्या थंडाव्यासाठी स्प्रिंकलर

पारा 42 वर पोहचल्याने नगर तापले आहे. ऐन उन्हात भाविकांची शनिशिंगणापूरात गर्दी झाली. उन्हापासून बचावाकरीता भाविक मार्गावर देवस्थानने स्प्रिंकलरने पाणी सोडले, त्यामुळे उन्हाची तीव्रता काहीसी कमी होण्यास मदत झाली. मंदिराच्या बाजुला अभिषेक मंडप उभारण्यात आला होता. लाखो भाविकांनी या मंडपात अभिषेक पूजा केली.

वाहतूक कोंडी अन्‌‍ पोलिस गायब

घोडेगाव व सोनई येथे बेशिस्तपणे आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे दिवसभरात अनेकदा वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस नसल्याने भाविकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

दुर्मिळ योग अन्‌‍ भाविकांची कोंडी

शनी जयंती व शनी अमावस्या एकाच दिवशी असा दुर्मिळ योग 13 वर्षानंतर आला होता. शनिवारी पहाटे पाच वाजता लागलेली अमावस्या रविवारी पहाटेपर्यंत असल्याने दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांना शनिदर्शनासाठी फक्त गेट नंबर 1 भुयारी मार्गे जाण्या येण्याची व्यवस्था असल्याने भाविकांना कोंडीचा त्रास जाणवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT