

नगर: आखाती युद्धामुळे होर्मुझ खाडी बंद असल्याने कच्च्या तेल आयातीला अडथळे येत आहेत. परिणामी मुंबईतील प्रकल्पातून डांबर निर्मितीत घट झाली आहे. त्याच्या झळा अहिल्यानगर जिल्ह्यालाही बसू लागल्या आहेत. नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला तीन आठवड्यापासून डांबर मिळालेले नाही. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे, जिल्हा परिषदेकडील सुमारे 467 रस्ता कामांचे खडीकरण झाले, मात्र डांबराअभावी कामे ठप्प झाल्याची सांगण्यात आले. डांबर मिळेपर्यंत ही कामे बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या डांबराच्या तीव्र टंचाईमुळे रस्ते विकासकामे ठप्प होऊ लागली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे हार्मोन्स खाडीतून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा अडचणीत अला आहे. मुंबईतील डांबर निर्मिती प्रकल्पावर त्याचे परिणाम दिसू लागले आहे. डांबराचे दर वाढले आहेत. मार्चमध्ये 50 रुपये किलोप्रमाणे मिळणारे डांबर, आज 88 रुपये किलोपर्यंत पोहचले आहे.
15 दिवस अगोदर मागणी करुनही डांबर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर मिळणाऱ्या डांबरातूनच कामे आटोपती घेतली जात आहेत. काही ठिकाणी डांबर मिळत नसल्याने त्यांनी कामे तूर्त थांबवल्याचेही सांगितले जाते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण, दुरुस्ती आणि नवीन रस्त्यांचे कामांची गती मंदावली आहे. पावसाळा काही आठवड्यांवर येवून ठेपला असताना अनेक कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
किती कामे थांबली; अधीक्षक अभियंता अनभिज्ञ?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता बावीस्कर यांनी निकृष्ट कामे सहन करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर आलेल्या अधीक्षक अभियंता यांची प्रशासनावरील पकड निसटली आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांचे कामांवर नियंत्रण राहिलेले नाही. कंत्राटदारांच्या कामांच्या प्रगतीकडेही दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात डांबराअभावी किती कामे थांबली आहेत, याचीही माहिती त्यांच्या कार्यालयात नाही. शाखा अभियंता शेळके हेही कागदी घोडे मिरवत असल्याने या विभागाचा कारभार चर्चेचा विषय बनला आहे.
होय, आपल्याकडेही डांबराचे शॉर्टेज जाणवू लागले आहे. त्याचे रेटही वाढले आहेत. पूर्वी 50 हजार रुपये टन असलेले डांबराचे रेट आता 90 हजारापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे डांबर मिळत नाही. त्याचा कामांवर परिणाम दिसू लागला आहे. डांबर मिळेपर्यंत थांबावेच लागणार आहे.
लक्ष्मीकांत जाधव, कार्यकारी अभियंता, नगर
आम्ही मुंबईतून डांबर आणतो. मात्र, रेट वाढले आहेत. पूर्वी 45 ते 50 रुपये किलोने मिळणारे डांबर आता 85 ते 90 रुपये किलोपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. त्यातही आरटीजीएसने पैसे पाठवूनही 15-15 दिवस डांबर मिळत नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांची कामे थांबलेली आहेत.
आसाराम ससाणे, पर्यवेक्षक, नगर-डोंग़रण मार्ग