नेवासा : जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिवारी (दि.27) सकाळी 11 वाजता शनिशिंगणापूर येथे येऊन प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थानाच्या अतिथीगृहात आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे स्वागत केले.(Latest Ahilyanagar News)
राज्य सरकारने गेल्या 22 सप्टेंबरला काढलेल्या आदेशानुसार, शनिशिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळ बरखास्त करीत, 2018 चा देवस्थान व्यवस्थापन कायदा लागू केला. त्याअंतर्गत तात्पुरता प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पदभार स्वीकाऱ्यापूर्वी डॉ. पंकज आशिया यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला आणि शनी चौथर्यावर जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भाविकांच्या श्रद्धेला योग्य न्याय देण्यासाठी पारदर्शक व भक्ताभिमुख प्रशासन उभारण्याचे आश्वासन दिले.
आमदार लंघे म्हणाले, देवस्थान प्रशासनाने भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासन लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करणार आहे. त्यात स्वतंत्र अधिकारी नेमण्याची कार्यवाही देखील केली जाईल. प्रशासन भाविकाभिमुख राहील याची खात्री दिली जाईल.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आपण सत्कार स्वीकारणार नाही, असे सांगत शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभार अतिशय चोख पार केला जाईल असे सांगितले. मागील गैरकारभार आरोपाबाबत ते म्हणाले येथून पुढे देवस्थानच्या कारभारात भाविकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले जाईल. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या वतीने देवस्थानमध्ये भाविकांसाठी सोयी-सुविधा करण्यासाठी काम केले जाईल.
सध्या अतिपावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहोत, असे यावेळी ते म्हणाले. यावेळी त्यांनी देवस्थान मधील कार्यालयात जाऊन देवस्थानचे कार्यालयीन अधीक्षक वाघ यांच्याकडून पदभार घेत फाईलवर स्वाक्षरी करून कारभार स्वीकारला.
भाजपाचे ऋषिकेश शेटे यांनी मागील प्रशासनावर सडकून टीका केली. तर मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी आभार मानले. शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाल्याने, भाविकांच्या अपेक्षा उंचावल्या असून पारदर्शक, कार्यक्षम आणि भक्ताभिमुख कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.