

कर्जत: तालुक्यातील बेलगाव, मिरजगाव, रवळगाव, कोकणगाव, निमगाव गांगर्डा, गुरवपिंपरी, होलेवाडी, परीटवाडी, करपडी आदी गावांतील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी व सीनानदीच्या पुराच्या तडाख्याने हतबल झाले आहेत.
शेतजमिनी वाहून गेल्या, उभं पीक पूर्णतः नष्ट झालं, आयुष्यच उद्ध्वस्त झालं... अशा या बिकट परिस्थितीत गुरुवारी (दि. 25) आ. रोहित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पावसाच्या पाण्यातून, चिखलातून वाट काढत त्यांनी शेतकरी कुटुंबांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. (Latest Ahilyanagar News)
आ. पवार यांनी नुकसानग्रस्त शेतजमिनींची प्रत्यक्ष पाहणी केली. काही ठिकाणी थेट शेतात पोहोचणं शक्य नसल्याने त्यांनी नागरिकांसोबत ट्रॅक्टरवरून प्रवास करत आढावा घेतला. दरम्यान, पंचनामे करत असलेल्या महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना त्यांनी सरसकट व न्याय्य पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
‘रोख मदतीने शेतकऱ्याला उभारी द्या’
आज शेतकरी फक्त पिकासाठी नाही, तर जगण्यासाठी झगडतोय. घोषणांनी नाही तर रोख मदतीने त्याला उभारी द्या, असे सांगून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी ठाम मागणी आ. पवार यांनी राज्य सरकारकडे केली.