

पारनेर : तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेत तत्कालिन चेअरमन आझाद ठुबे यांच्यासह संचालक मंडळाने नियमबाह्य कर्जाची खैरात करत 81 कोटी 25 लाख 63 हजार 410 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे सहकारी संस्थाचे द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 राजेंद्र निकम यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांसह बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलणारे अशा एकूण 46 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. (Latest Ahilyanagar News)
ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यासबंधीची पुरवणी फिर्याद लेखापरीक्षकांनी ऑगस्ट 2025 मध्ये देण्यात आली आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या गैरव्यवहाराचा तपास सोपविण्यात आला.परंतु आर्थिक गुन्हे शाखेकडून हा तपास कासव गतीने चालू असून आरोपी रोजरासपणे मोकाट फिरत आहेत, तर ठेवीदार मात्र हवालदिल झाले आहे.
सहकार विभागाचे विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी चाचणी लेखा परीक्षणानुसार 66 कोटी 69 लाख 3 हजार 228 व व्याज 14 कोटी 56 लाख 60 हजार 182 ( 31 मार्च 2025 अखेर व्याज) असे एकूण 81 कोटी 25 लाख 63 हजार 410 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेले किरण शंकर ठुबे, राजेंद्र दादाभाऊ ठुबे, अशोक एकनाथ ठुबे, ज्ञानेश्वर बापू ठुबे यांच्यासह तौफिक युसूफ इनामदार, शितल बाळकृष्ण झावरे, बाळकृष्ण संपत झावरे, युसूफ हसन इनामदार, संदीप बाळासाहेब ठुबे या कर्जदारांनी पतसंस्थेचे चेअरमन आझाद प्रभाकर ठुबे यांनी आमच्या नावे बोगस कर्ज उचलले असल्याचे लेखी म्हणणे सहकार आयुक्तांना सादर केले आहे. या अगोदर पतसंस्थेचे अध्यक्ष आझाद ठुबे यांच्यासह उपाध्यक्ष शमशुद्दिन हवालदार यांच्यासह कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह 14 जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात 29 जुलै 2024 रोजी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा अंतर्गत व आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबंधीची फिर्याद ठेवीदार बाळासाहेब वाळुंज (वय 60 राहणार काकणेवाडी) यांच्यासह सहा ठेवीदारांनी दिली आहे. त्यामध्येच हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे या पतसंस्था घोटाळ्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.