सोनई : शनि अमावास्या आणि श्रावण समाप्तीमुळे संभाव्य गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शुक्रवार आणि शनिवार (दि.22,23) शनि चौथ्यावरील तेल अभिषेक बंद करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळ व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. चौथर्यासमोरून भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
शनि अमावास्येनिमित्त शनिशिंगणापूर येथे सुरक्षा व गर्दीचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला. 23 ऑगस्टला शनी अमावास्या आणि श्रावण महिना समाप्ती होत आहे. शनिवार, रविवारीच्या सलग सुट्टीमुळे शनिशिंगणापूर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानची संयुक्त बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. शनिवारी सकाळी 11:35 पर्यंत शनि अमावास्या असल्याने यात्रा भरणार आहे.
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुरक्षेतेच्या कारणास्तव शुक्रवारी मध्यरात्रीची महाआरती होण्या अगोदर शुक्रवारपासून ते शनिवार सायंकाळीची आरती संपेपर्यंत चौथ्यावरील तेल अभिषेक दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय दिवसांचे विश्वस्त मंडळाने घेतला. भाविकांनी चौथर्याच्या समोरून शांततेत शनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विश्वस्त मंडळाने रात्री दर्शन बंदचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेताना काही दिवस रात्रभर दर्शनाचा निर्णयही घेतलेला आहे. त्यानुसार शनी अमावास्या असल्याने शुक्रवारी सकाळ पासून ते रविवार सकाळपर्यंत मंदिर शनि दर्शनासाठी खुले राहणार आहे.