

पिंपरी : तलाक न दिल्याच्या रागातून एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने ब्लेडने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना थेरगाव येथील एमएम चौकात शनिवारी (दि. 16) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.
सलमान रमजान शेख (29, रा. रोहन वागे, विजयनगर, काळेवाडी, पुणे) आणि हुजेफा आबेद शेख (27, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, मूळ रा. वाहेगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी नाणेकर चाळ, भारतनगर, पिंपरी येथील 22 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिने याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामावर असताना आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. आरोपी सलमान याने, तलाक का देत नाहीस, या कारणावरून तसेच फिर्यादीच्या कामावरील सहकार्यांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्या गळ्यावर व हातावर ब्लेडने वार केले. प्रतिकार करताना तिच्या डोक्यावर, गालावर व कानामागेही वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. काळेवाडी पोलिस तपास करीत आहे.