

Newasa Furniture Shop Fire 5 Death
नेवासा : नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका फर्निचर दुकानाच्या भीषण आगीच्या घटनेने परिसर हादरला आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने नेवाशात शोककळा पसरली आहे. मयूरचे आई वडील बाहेरगावी असल्याने ते बचावले आहेत. (Ahilyanagar Latest News)
नेवासा फाटा कालेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानाला रात्री दीड च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले. आगीचा भडका इतका तीव्र होता की, कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल (वय 30), त्यांचे दोन मुलं अंश (वय 11), चैतन्य (वय 6) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने बचावले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. दुकानातील लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.