नगर: शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 17 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन 23 मे रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लांडे, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, 16 व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपत बारस्कर, संमेलनाध्यक्ष डॉ. संजीवनी तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे व शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे, अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्यध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे हर्षल आगळे, इंजिनिअर परिमल निकम, जयंत गायकवाड आदी उपस्थित होते.
शनिवारी सकाळी उद्घाटनापूर्वी सकाळी महापुरुषांना अभिवादन करून शाहिरी जलसा होणार आहे. दुपारी आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण या विषयावर परिसंवाद रंगेल. कवयित्री माधुरी मरकड यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन होईल. याप्रसंगी दंगलकार नितीन चंदनशिवे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्राचार्य चंद्रकांत भोसले व प्रा. शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी बदलते ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्राचार्य डॉ. संजय नगरकर, पत्रकार सुधीर लंके, प्रा. डॉ. गणेश मोहिते सहभागी होणार आहेत. सायंकाळी गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल काव्य संमेलन’ रंगणार आहे. दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी सकाळी कथा व काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा. डॉ. संजय पाईकराव, संदीप रोहकले यांच्या हस्ते होणार असून प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे,प्राचार्य बाळासाहेब सागडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर, प्रभाकर सूर्यवंशी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहेत. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कविवर्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे काव्य संमेलन होणार आहे. दुपारी असा मी घडलो... हे चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी ग्रंथविक्रेत्यामुळे वाचन चळवळीला पाठबळ मिळते का या विषयावर चर्चासत्र होणार आहे. दुपारी 4 वाजता संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी माजी आमदार कविवर्य लहू कानडे, पाथर्डी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, कॉ. बाबा आरगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शब्दगंध 20 वर्षांचा विरत ज्ञान यज्ञ: बनसोडे
बनसोडे म्हणाले, स्व. अरूणकाका जगताप आणि शब्दगंध साहित्य परिषदेचे अत्यंत जवळचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्व. अरुणकाका साहित्य नगरी असे नाव दिले आहे. साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य चळवळ सुरू आहे. हा ज्ञान यज्ञ पुढे नेण्याचा मान यंदा आम्हाला मिळाला याचा आनंद आहे.
आजकालच्या अभासी दुनियात माणूस वास्तव विसरत चालला आहे. साहित्यामुळे माणसाला वास्तावचे भान येते आणि समाज मन कळते. साहित्य संमलेनाची जय्यत तयारी केली असून, सर्व पाहुणे, कवी, व्याख्याते, साहित्यिक यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दोन दिवस स्व. अरुणकाका साहित्यनगरीमध्ये नगरकरांना साहित्याची मेजवाणी मिळणार आहे. कथा, कविता, शाहिरी जलसा ऐकायला मिळणार आहे.