Shabdagandha Sahitya Sammelan Pudhari
अहिल्यानगर

Shabdagandh Sahitya Sammelan: साहित्यिक, पत्रकारांनी जागल्याची भूमिका पार पाडावी: प्रा. डॉ. संदीप सांगळे

समाजात अराजक निर्माण झाल्यास साहित्य हेच उत्तर; शब्दगंध साहित्य संमेलनात विचारमंथन

पुढारी वृत्तसेवा

नगर: लेखकांनीही वास्तवावर प्रकाश टाकण्याचे काम केले पाहिजे. समाजामध्ये अराजक निर्माण झाल्यास त्यावर साहित्य हेच उत्तर असते. आजकालची सामाजिक परिस्थिती पाहता साहित्यिक, पत्रकार व कलावंतांनी जागल्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहन शब्दगंंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी केले. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

ते म्हणाले, शब्दगंध साहित्यिक परिषदेने मला 17 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याची संधी दिली. याचा मला एक भूमिपुत्र म्हणून मोठा अभिमान आहे. मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाहीत. संतांचा विचार त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे.

अहिल्यानगरच्या मातीला नाथ संप्रदाय, महानुभव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, शाहिरी परंपरा असा वारसा लाभलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही आनंदाची बाब आहे. संत, पंत, तंत यांनी मराठी भाषा प्रवाही ठेवली. त्यात संत साहित्याचे, वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आता साचलेली मराठी स्वच्छ, निखळ, संथपणे प्रवाही राहिली पाहिजे. ते ठेवण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे साहित्याची वाट कधी सोडू नये. साहित्य हे एखाद्या निर्मळ झऱ्यासारखे प्रवाही असले पाहिजे.

माणसाच्या संवदेना जागरूक करण्याचे काम साहित्य करते. अस्वस्थ मने दुरुस्त करण्याचे कामही साहित्य करते. आजकाल वारकरी संप्रदायामध्ये राजकारण सुरू आहे. शहाणे करून सोडावे सकल जना, ही संत परंपरेची विचारधारा मागे पडल्याचे दिसून येते. एकमेकांना राजकीय उत्तेजन देणे, तोंड काळे करणे असला कोणता विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. त्याबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

न्यायमूर्तींनी तरुणांना कॉकरोच म्हटले, त्यावरून सोशल मीडियावर तरुणामध्ये कॉकरोच जनता पार्टी चळवळ उभी राहिली. ही व्यवस्थेबद्दल असलेली चीड आहे. लोकप्रतिनिधींनी जनसेवकाची भूमिका पार पाडली पाहिजे. जनमानसाचे प्रश्न सोडविण्याचे काम राजकीय नेत्यांनी केले पाहिजे अन्यथा नेते कमी पडले असे म्हणता येईल. व्यवस्थेविरोधातील चीड म्हणजे भारताचा बांगलादेश, श्रीलंका होण्यास वेळ लागणार नाही. हा आपल्याला इशाराही आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात साहित्यिकांनी सजग भूमिका घेतली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT