Satrala Trader Attack Protest Pudhari
अहिल्यानगर

Satrala Trader Attack Protest: सात्रळ–सोनगावमध्ये व्यापारी रमेश पन्हाळे यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा शांततामय निषेध

कायद्याची कडक अंमलबजावणी व आरोपींवर तातडीची कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी; वाळू उपसा व गुन्हेगारीवरही चिंता व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

सोनगाव: सात्रळ येथील व्यापारी रमेश पन्हाळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी काल सोमवारी एकत्र येत शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. यावेळी सात्रळ ग्रुप सोसायटीसमोर आयोजित सभेत नागरिकांनी प्रतिक्रिया देत, गावातील सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

यावेळी उपस्थितांनी सभेत सदर घटनेला दुर्दैवी म्हणत, अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होते, असे नमूद केले. गावातील वातावरण शांत व सुरक्षित राहणे आवश्यक आहे. मतभेद असले तरी ते संवादातून सोडवले गेले पाहिजेत, असे मत मांडले. गावाचा एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. काही नागरिकांनी गावात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित देखरेख यामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेही मत व्यक्त करण्यात आले. सभेत वाळू उपसा व इतर अवैध व्यवहारांचा मुद्दाही उपस्थित झाला. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर गुन्हेगारीला आळा बसू शकतो, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

हल्ल्याशी संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करून कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कायद्यावरील विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे मत सभेतून पुढे आले. तसेच, गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सर्वांनी संयमाने वागण्याचे आवाहन करण्यात आले.

या निषेध सभेला सात्रळ, सोनगाव, धानोरे परिसरातील ग्रामस्थ, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मंत्री विखेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

सदर घटनेनंतर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सात्रळ येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहे.

मारहाण करुन आरोपींचे पलायन

शुक्रवारी रात्री सात्रळ-पाथरे मार्गावरील जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी व्यापारी पन्हाळे यांना एका हॉस्पिटलसमोर अडवले. त्यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पन्हाळे यांच्या खिशातील सुमारे 25 हजारांची रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच मारहाण करून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी पन्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT