संगमनेर: सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग करून, तिला मारहाण करणाऱ्या एका शिक्षकाला येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांनी, दोषी ठरवून, तीन वर्षे सक्तमजुरीसह 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दत्तू किसन कौटे असे या शिक्षकाचे नाव आहे.
एका माध्यमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडली होती. पिडित शिक्षिकेने पतीच्या वाढदिवसानिमित्त मिळालेला पुष्पगुच्छ शाळेत आणला होता. तो विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात मुख्याध्यापकास भेट दिला. या कारणावरून आरोपी दत्तू कौटे याने पिडित शिक्षिकेकडे वाद उकरून काढला होता.
13 फेब्रुवारी 2025 रोजी स्टाफ रूममध्ये पिडित शिक्षिकेचा त्याने अपमान केला. दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी पिडित शिक्षिका शाळेच्या मंचावर बसलेली असताना, कौटे याने विद्यार्थ्यांसमोर अपमान करीत, हात धरुन विनयभंग करीत तिला चापट मारली. या हल्ल्यामुळे पिडित शिक्षिका जागीच बेशुद्ध होत पडली होती.
याप्रकरणी पिडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस कॉन्स्टेबल संपत जायभाय यांनी, या गंभीर प्रकरणाचा तपास करुन, संगमनेर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. सहाय्यक सरकारी अभियोक्ता पायल बी. एखंडे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. पिडित महिला व पतीसह एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
आरोपीने बचावासाठी केलेले सर्व दावे फेटाळून न्यायालयाने पिडित शिक्षिकेची साक्ष विश्वसनीय मानली. एका महिला शिक्षिकेबाबत घडलेली ही घटना समाजासाठी घातक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या खटल्याचा निकाल देताना, न्यायाधीशांनी आरोपीला दोषी धरले. आरोपी दत्तु कौटे याला तीन वर्षे सक्तमजुरीचा कारावास व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची 10 हजार रुपये रक्कम पिडित शिक्षिकेला नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.