Sangamner Illegal Garbage Dumping Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Illegal Garbage Dumping: संगमनेरमध्ये शांती घाट परिसरात कचरा व राडारोड्यामुळे नागरिक त्रस्त

रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने वाहतुकीला अडथळा; नगरपालिकेच्या कारवाईची मागणी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: येथील शांती घाटाजवळील रस्त्याच्या कडेला कचऱ्यासह राडारोडा आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचण होत असल्याने नगरपालिकेने तातडीने हा कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संगमनेर नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी कचरा, राडारोडा टाकला जात आहे. तो वेळीच उचलला जात नाही. शहरातील अकोले नाका, जाजू पेट्रोल पंप मागील म्हाळुंगी नदी लगत असलेल्या रस्त्यावर तसेच जुने माधव चित्रमंदिर जवळील छोटा पुला, शांतीघाटा जवळील संगमनेर खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूस कचरा टाकला आहे.

खाजगी व्यक्ती तसेच परिसरात बांधकाम सुरू असलेले नागरिक या ठिकाणी कचऱ्यासह राडारोडा मोठ्या प्रमाणावर आणून टाकतात. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा व राडारोडा साचला आहे. त्यामुळे रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांची व वाहन धारकांची अडचण होते. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याने जाताना अपघाताची शक्यता आहे.

दोन्ही बाजूला राडारोडासह कचरा टाकल्याने तो रस्त्यावर आला आहे. नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी ठेकेदार नेमला असताना हा राडारोडा का उचलला जात नाही, असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच या ठिकाणी राडारोडा, कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा. एकीकडे स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर, अशी संकल्पना राबविताना स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे.

काळजी न घेतल्याने दुर्गंधी

आता पालिकेत नवीन नगरसेवक आल्याने जनतेची कामे गतीने होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांची वेळेत कामे होत नाही, असा अनुभव येत आहे. स्वच्छतेबाबत पालिकेने काळजी न घेतल्याने दुर्गंधी येत असून डासांचे प्रमाणही वाढले. शहरातील सर्वच राडारोडा नगरपालिकेने उचलणे गरजेचे असून राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई व दंड करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT