Wedding Procession Attack Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Crime: लग्नाच्या वरातीत घुसून नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर जीवघेणा हल्ला; 10 ते 15 जणांवर गुन्हा

सतेचीवाडीतील धक्कादायक घटना; पूर्वीच्या वादातून लोखंडी गज, दगड आणि काठ्यांनी मारहाण

पुढारी वृत्तसेवा

घारगाव: संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात सतेचीवाडी येथे लग्न समारंभ आटोपल्यानंतर घरासमोर सुरू असलेल्या वरातीत घुसून नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर लोखंडी गज, दगड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी यमाजी पवार (वय ४८) यांच्या मुलाचा विवाह २२ जून रोजी उत्साहात झाला होता. रात्री सुमारे ११.१५ वाजता घरासमोर लग्नाची वरात सुरू होती. यावेळी नवरीचा चुलतभाऊ मनोहर नामदेव दुधवडे (रा. पारदरा, ता. पारनेर) हा आपल्या १० ते १५ साथीदारांसह अचानक वरातीच्या ठिकाणी आला. त्यानंतर पूर्वीच्या वादाची कुरापत काढून त्याने नवरदेवाच्या नातेवाईकांशी वाद घालण्यास सुरुवात केली, ज्याचे पर्यवसान पुढे हाणामारीत झाले.

सबंधित वाद सुरू असताना वाद मिटविण्यासाठी नवरदेवाचे वडील शिवाजी पवार तसेच त्यांची मुले योगेश व प्रदीप हे भांडण सोडवण्यासाठी आले. मात्र, मुख्य आरोपी मनोहर दुधवडे याने शिवाजी पवार यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने गंभीर प्रहार केला. तसेच त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी योगेश व प्रदीप यांना लोखंडी गज आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर जर पोलिसात तक्रार दिली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी मनोहर नामदेव दुधवडे व त्याच्या १० ते १५ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आदिनाथ गांधले पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT