Sangamner Women Protest Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Women Protest: संगमनेरमध्ये महिलांचे ठिय्या आंदोलन; मानधन वादावरून पोलिसांशी वाद

पंचायत समिती अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप; गुन्हा नोंदवण्यावरून तणावपूर्ण परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: बचत गटाच्या एका महिलेने मानधनाची मागणी केली. मात्र चिडलेल्या पंचायत समितीच्या अधिकार्याने महिलेशी वाद घालून गैरवर्तन केले. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी महिलांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये काल मंगळवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दखल करण्यास असमर्थता दर्शवल्याने महिला व पोलिसात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी ‌‘एनसी‌’ दाखल करून घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बचत गटाचे काम करणाऱ्या एका महिलेचे दहा महिन्यांपासूनचे मानधन थकलेे होते. या मानधनाची मागणी करण्यासाठी महिला पंचायत समितीत गेली. मात्र यावेळी नंदलाल पोपटलाल कोकाटे या अधिकाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला. शहर पोलिसांनी रात्री उशिरा पर्यंत महिलेला बसवून ठेवत तक्रार दाखल करून घेण्यात टाळाटाळ केली. दरम्यान, पंचायत समितीत त्रास दिला जात असल्याचा आरोप इतरही महिलांनी केला. यामुळे संतापलेल्या शेकडो महिलांनी मंगळवारी संगमनेर शहर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पद्माताई थोरात, दिपाली वर्पे, रोहिणी गुंजाळ, डॉ. अनुराधा सातपुते, सुनिता कांदळकर, सुरभी मोरे, निशा कोकणे, संगीता थोरात, सुनिता दिघे, मंगल काकड, अनिता काकड, वनिता यादव, नंदा यादव, लता यादव, वनिता विधाटे, कल्पना थोरात, निर्मला थोरात, ज्योती थोरात, अर्चनाताई बालोडे, प्रमिलाताई अभंग, सुनिता कांदळकर, सविता थोरात, शोभा थोरात, दीपिका थोरात, ऋतुजा थोरात, यमुनाबाई मनले, अलका शिरसाठ आदी महिला उपस्थित होत्या.

पोलिस प्रशासन-महिलांमध्ये शाब्दीक चकमक

मानधन मागतल्याने महिलेशी अधिकाऱ्याने गैरवर्तन केले, याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शरद ा थोरात यांना सांगितल्यानंतर काही युवक कार्यकर्त्यांनी संतापून या अधिकाऱ्याला जाब विचारला. याशिवाय, तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर सोमवारी रात्री दोन वाजेपर्यंत बसून ठेवले. राजकीय फोन आल्याने पोलिसांनी टाळाटाळ केली, असा आरोप केला गेला आहे. पोलिस उपाधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर व महिलात जोरदार शाब्दिक चकमक झाली. तीन तास हे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून पंचायत समितीचे अधिकारी नंदलाल कोकाटे विरोधात तक्रार दाखल करून घेतली. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मारहाण अन्‌‍ काम बंद

महिलेचे मानधन रोखल्याचा राग धरत पंचायत समितीत येऊन शासकीय कामात अडथळा आणला, शिवाय दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याची तक्रार नंदलाल कोकाटे यांनी शहर पोलिसात दिली आहे. यावरून शरद थोरात यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांचे कामबंद

संगमनेर पंचायत समितीमधील महिला बचत गटाचे समुदाय संसाधन अभियान व्यवस्थापकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात मंगळवारी (दि.24) कामबंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला.या प्रकरणावरून सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने वेगळी चर्चा होऊ लागली आहे. आज बुधवारपासून काळ्या फिती लावून काम काज करण्याचा निर्णयही सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या घटनेवरून सत्ताधारी व विरोधात आरोप प्रत्यारोप झाले असून काही अधिकारी महिलांशी सातत्याने गैरवर्तन करण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT