संगमनेर: पावसाची रिमझिम, टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ नि विठ्ठलनामाचा जयघोष करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे रविवारी (दि. ५) अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले. संगमनेर तालुक्यातील पारेगाव परिसरात पंचक्रोशीतील नागरिकांनी या दिंडीचे भक्तिभावाने स्वागत केले.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांच्या पालखीसमवेत पंढरपूरला निघाले आहे. रविवारी (दि.५) सांयकाळी पाचच्या सुमारास पालखीचे संगमनेर तालुक्यात आगमन झाले. या वेळी अधिकाऱ्यांनी पालखीचे पूजन व स्वागत केले. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, डॉ. जयश्री थोरात, निलम खताळ, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार धीरज मांजरे,
डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रवीण सांळुखे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, दिंडीचे माधव महाराज राठी आदींसह अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील वारकरी, नागरिक सहभागी झाले होते.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीत सुमारे वीस हजार भाविक लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले आहेत. पालखी नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील मुक्काम उरकून मऱ्हळ-निऱ्हाळेमार्गे अहिल्यानगर जिल्ह्यात पारेगाव बुद्रुक शिवारात आशापीर बाबा टेकडीजवळ आली. यावेळी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळकरी मुलींनी लेझीम खेळत स्वागत केले. भाविक भक्तांनीही फुगडी खेळली. भाविकाच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ पत्नी नीलम खताळ यांनी दिंडीतील वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
पारेगाव बुद्रुक शिवेवर पालखीचे आगमन होताच पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरी अंगावर घेत भाविक चालत होते. पारेगाव येथे पालखी मुक्कामी आली. गावातील व परिसरातील नागरिक सेवेसाठी आले. पाण्याच्या बाटल्या, फळे वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली. शासनाकडूनही वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
बी आर. चकोर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, संपतराव गोडगे, डॉ दत्तात्रय गडाख, ॲड त्रंबक गडाख, दौलतराव गडाख, सोमनाथ गडाख, दिंडीचे माधव महाराज राठी आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
अमृत, एसएमबीटीतर्फे सुविधा
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अनेक वर्षांपासून स्वागत व पूजन केले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने डॉक्टरांचे पथक, नर्स, वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या.
सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकरी, नागरिक आणि सर्व जनता सुखी समाधानी होऊ दे, हीच विठूरायाच्या चरणी यानिमित्त प्रार्थना.माजी मंत्री बाळासाहेब थोरात
समतेचा संदेश देणाऱ्या या वारीच्या माध्यमातून, पंढरीनाथाला प्रार्थना करतो, की सर्वत्र चांगला पाऊस पडून महाराष्ट्रातील जनता सुखी होऊ दे.खासदार राजाभाऊ वाजे
दिंडीसाठी सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची सरकारने काळजी घेतली आहे.आमदार अमोल खताळ