संगमनेर: संगमनेर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रीया पार पडून नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभारही स्वीकारला आहे. आता सर्वांचे लक्ष उपनगराध्यक्ष पदाकडे लागले आहे. मात्र, या निवडीवरून सेवा समितीच्या नगरसेवकांत सध्या नाराजीनाट्य आणि प्रचंड रस्सीखेच, असे दोन्ही अंक सोबतच पहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवड लक्ष्यवेधी बनली आहे.
संगमनेर नगरपालिकेत इंडियन फार्वड ब्लॉक अर्थात संगमनेर सेवा समितीची निर्विवाद सत्ता आहे. यात एकूण 30 नगरसेवक असून, यापैकी 27 नगरसेवक हे संगमनेर सेवा समितीचे आहेत. तर अपक्ष दोन व शिंदे शिवसेना गटाचे एक नगरसेविका आहे. यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सत्ताधारी गटातून उमेदवार अधिक आहे.
नगरसेवकांचा दावा
जुन्या व अनुभवी नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. तर काही नव्या नगरसेवकांनीही संधी देण्याचे मागणी केले आहे. यामुळे नव्या जुन्यांचा मेळ घालून अनुभवी व अभ्यासू व्यक्तींना संधी दिली जाणार असली तरी अंतर्गत नाराजीनाट्यमुळे उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.
महिलेला संधी देणार?
नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने जनतेतून मैथिलीताई तांबे निवडून आल्या आहेत. यामुळे आता उपनगराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यातच आता उपनगराध्यक्ष पदावर महिलांनाच संधी द्यावी, अशी मागणी महिला नगरसेविकांतून जोर धरू लागली आहे. यामुळे जुने नवे असा वाद होत असल्याने नाराजीनाट्य दिसून येत आहे.
कोणाची नावे चर्चेत
जुन्या व अनुभवी नगरसेवकात दिलीपराव पुंड, विश्वास मुर्तडक, गजेंद्र अभंग, किशोर पवार, किशोर टोकसे, शेख नुरमोहमंद पिरमोहम्मद, तर नितीन अभंग, गणेश गुंजाळ, शैलेश कलंत्री, मुजिबखान अब्दुलखान पठाण, डॉ. दानिश खान शहानवाज रईस, सौरभ कासार, भारत बोऱ्हाडे हे तरुण नगरसेवक आहेत, महिलांमध्ये शोभा बाळासाहेब पवार या अनुभवी नगरसेविका आहे. तर डॉ.अनुराधा सातपुते, मालती डाके, प्रियंका शाह, अर्चना दिघे, सरोजना पगडाल, नंदा गरुडकर, दिपाली पंचारिया यासह इतर नगरसेविका नविन आहे. यामुळे या सर्वातून कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपक्ष नगरसेवक योगेश अशोक जाजू यांनाही लॉटरीची अपेक्षा आहे.