Municipal Election Pudhari
अहिल्यानगर

Municipal Election: संगमनेरात नगरपालिका निवडणुकीला वेग; महिलांचे मतदारसंख्याबळ ठरवणार समीकरणे!

57 हजार 714 मतदार मतदानासाठी सज्ज; महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक, राजकीय पक्षांत उमेदवार चाचपणीची लगबग

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: नगरपालिका निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी करताच, संगमनेरात राजकीय हालचालींना गती आली आहे. 15 प्रभागात 30 नगरसेवक असणार आहेत. नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्यायचा आहे. संगमनेर नगरपालिकेसाठी 57 हजार 714 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष असे की, यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे.  (Latest Ahilyanagar News)

गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या, मात्र निवडणूक आयोगाने अखेर नगरपालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा करून, कार्यक्रम जाहीर केला आहे. ही घोषणा होताच संगमनेरात नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तत्काळ सायंकाळी आपापल्या विभागात बैठका घेतल्या. निवडणुकीसाठी वेळ कमी असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निवडणुकीत उमेदवारांची धावपळ होणार आहे. प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे.

संगमनेर शहराचा विचार करता नगरपालिका निवडणुकीसाठी 57 हजार 714 मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 28 हजार 390 तर, महिला मतदारांची संख्या 29 हजार 324 आहे. शहरात 934 महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहेत. शहरात महायुती की, महाविकास आघाडी याबाबत अद्यापही निर्णय होऊ शकला नाही. अशातच थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होत आहे.

सर्वच राजकीय पक्षांना उमेदवाराची चाचपणी करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महायुतीत अंतर्गत वाद आहेत. भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, तर काँग्रेस कडूनही उमेदवार दिला जाणार आहे. नगराध्यक्षपदासह पालिकेतील नगरसेवक काँग्रेसचेच अधिक असावेत, यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. इतर पक्षांसाठी आता ही निवडणूक मात्र प्रतिष्ठेचा मुद्दा असणार आहे.

महायुतीकडून चर्चेस पुढाकार नाही

संगमनेर नगरपालिकेत आपली एक हाती सत्ता असावी, यासाठी काँग्रेस पक्षाने महाआघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी केली आहे. यावेळी तुल्यबळ व तरुण उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. यासाठी भेटीगाठींवर भर दिला जात आहे. महायुतीकडून अद्याप चर्चेसाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे शिवसेना कसा प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT