संगमनेर : संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी काल बुधवारी (दि.26) रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. संगमनेर सेवा समितीला सिंह तर, भाजपा कमळ, राष्ट्रवादी घळ्याळ असे पक्षाचे अधिकृत चिन्ह देण्यात आली आहेत. अपक्षांना रिक्षा, नारळ, छत्री, कपाट असे चिन्ह दिले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिली.
संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षासह 15 प्रभागातून 30 नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपद सर्व साधारण महिला राखीव आहे. या एका जागेसाठी 8 महिला रिंगणात उतरल्या आहेत. नगराध्यक्षपदाची लढत संगमनेर सेवा समिती, महायुती व अपक्षात होत आहे. तर 30 नगरसेवकात 15 महिला नगर सेविका असणार आहेत. 30 जागांसाठी 113 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना राष्ट्रवादी आपल्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. संगमनेर सेवा समितीला सिंह चिन्ह दिले आहे. काही प्रभागात राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत करीत आहे.
अपक्षांना इस्तरी, रिक्षा, नारळ, छत्री, कोट, कपाट, शिलाई मशिन, टोपी, शिट्टी, स्टुल, ट्रक्टर, बॅट , टी.व्ही. या विविध चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे. चिन्ह मिळाल्याने उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. प्रभाग 9 मध्ये 10 उमेदवार, 10, 11 मध्ये 11 उमेदवार रिंगणात आहेत. तर, प्रभाग 1 ते 7 व 12, 14 मध्ये उमेदवार संख्या कमी आहे. 13 मध्ये9, तर 15 मध्ये 9 उमेदवार आहेत.
संगमनेर सेवा समिती- महायुतीत सरळ-सरळ लढत होत आहे. अपक्षही आपले नशीब अजमावत आहेत. नगराध्यक्षपदासाठी डॉ. मैथिली सत्यजित तांबे व सुवर्णा संदीप खताळ यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मेघा भगत यांनी, बंडखोरी केली, मात्र पक्षाने कारवाई करण्याची हालचाल सुरु केली आहे. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही.
एकूणच आता संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. संगमनेर सेवा समिती, महायुती व अपक्षही मैदानात उतरल्यामुळे चुरस वाढली आहे.