संगमनेर: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मालदाड गावातील मजुरांनी टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा गजर करत प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी (दि.11) पंचायत समितीसमोर आंदोलन केले.
मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांवर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पंचायत समिती संगमनेर मार्फत काढण्यात येणारे हजेरी मस्टर दि. 2 फेब्रुवारी 2026 पासून काढण्यात आले नसल्याने मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
गेल्या तीन महिन्यांपासून मजुरांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नसल्यामुळे संतप्त मजुरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून टाळ मृदुंगाच्या गजरात विविध अभंग म्हणत आंदोलन केले. त्यांनी मजुरांचे मस्टर तत्काळ काढण्यात येतील, तसेच प्रलंबित मानधनाबाबत त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना मस्टर काढण्याचे आदेश दिले.
गट विकास अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. या आंदोलनाचे नेतृत्व मालदाड गावचे सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले यांनी केले. या आंदोलनासाठी मालदाड गावातील नागरिक व मनरेगा मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाभार्थींचे पैसे तातडीने द्या; सरपंच नवले
सध्याचे सरकार घोषणा करत आहे. मात्र जनतेचे पैसे देत नाही. सर्वसामान्यांच्या मनामध्ये सरकार बद्दल राग आहे. मात्र सरकार विरोधात मतदान करूनही अनेक ठिकाणी सत्ताधारी लोक निवडून येतात कसे, हा मोठा प्रश्न आहे. आमचे पैसे तातडीने द्या, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करू, असा इशारा मालदाडचे सरपंच गोरक्षनाथ नवले यांनी दिला.