Police Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Drugs Case: ‘एमडी’ प्रकरणाची चौकशी; पोलिसांवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप

सीसीटीव्ही फुटेज जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे; पाथर्डीचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे नियंत्रण कक्षात

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून आपल्या मुलाला अंमली पदार्थाच्या खोटया गुन्ह्यात अडकवल्याची तक्रार करताना, त्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज असद रऊफ कुरेशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याचेही समजले.

संगमनेर शहर बसस्थानक परिसरात दि. ३ सप्टेंबर रोजी रात्री ३९ ग्रॅम 'एम.डी.' (मेफेड्रोन) ड्रग्ज विकताना आरोपी काशिफ असद कुरेशी याला उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी अटक केली होती. सापळा रचून ही कारवाई केल्याचे सांगितले गेले. मात्र हे सर्व प्रकरण बनावट असल्याची तक्रार काशिफच्या वडिलांनी केली. आपल्या मुलाच्या मित्रांशी संगनमत करून पोलिस निरीक्षक समीर बारवकर व उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यासाठी पुरावा असलेले सीसीटीव्ही फुटेजही जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर केल्याचे समजले. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश केल्याचेही समजले. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे कंट्रोलला

पाथर्डी पोलिस ठाण्यातील कर्मचारी विनोद मासळकर यांच्या लाचखोरीनंतर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात (कंट्रोल) बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याकडे प्रभारी सूत्रे देण्यात आली आहेत.

सुमारे सव्वातीन महिन्यांपूर्वीच कोकरे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याची सूत्रे स्वीकारली होती. शनिवारी पोलिस कर्मचारी विनोद मासळकर यास एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस निरीक्षक कोकरे यांच्या बदलीचे आदेश निघाले.

मासळकर लाचेच्या सापळ्यात अडकण्यापूर्वीही कोकरे यांच्याबद्दलच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या. कोकरे यांचे खास म्हणून मासळकर यांच्या नावाची चर्चा पाथर्डीत आहे. त्यामुळेच कोकरे यांच्या बदलीमागे लाचेची किनार असल्याचे बोलले जाते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची स्पष्टता केलेली नाही. पाथर्डी पोलिस ठाण्याचे नवे कारभारी कोण असतील, ते कार्यपद्धतीत काही बदल करणार का? याची उत्सुकता पाथर्डीकरांमध्ये आहे.

आधी पुजारी, नंतर कोकरे

पाथर्डी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचीही विविध कारणांमुळे एक वर्षाच्या आत बदली झाली होती. त्यानंतर आता आनंद कोकरे यांचीही अवघ्या तीन महिने नऊ दिवसांत बदली झाल्याने पाथर्डी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अल्पकालीन नियुक्त्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

ज्यांनी जनतेचे रक्षण करायला पाहिजे, तेच पोलिस प्रशासनच असा घात करत असतील, तर खूपच काळजी करण्याच्या गोष्टी आहेत.
बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते, काँग्रेस
दि ३ सप्टेंबरला संध्याकाळी कारवाई, पंचनामा रात्री बारा वाजता, तर गुन्हा दि. ४ सप्टेंबरला दाखल केला. आरोपीच्या खिशातून ३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज रिकव्हर केल्याचे पंचनाम्यात दर्शविले आणि दुसरीकडे ते दुचाकीत सापडल्याचे सांगण्यात आले. यावरून काशीफच्या कुटुंबीयांच्या खोट्या गुन्हयात अडकविल्याच्या आक्षेपास बळ मिळते.
ॲड. शरीफ पठाण, आरोपीचे वकील
अमली पदार्थांच्या कारवाईबाबत तपास पूर्ण झाला आहे. त्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला आजच पाठविला आहे. त्या अहवालानुसार जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर लागलीच कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
सोमनाथ वाकचौरे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT