Sangamner Hailstorm Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Hailstorm: संगमनेरमध्ये गारपीट-वादळी पावसाचा तडाखा; पिके आणि घरांचे नुकसान, मुलगी जखमी

धांदरफळ परिसरात पत्रे उडून मोठी हानी; शेतकऱ्यांकडून शासनाकडे मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: तालुक्यातील धांदरफळ बुद्रुकसह परिसरात रविवारी (दि.29) सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाने पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले. यात उडालेला पत्रा लागून एक मुलगी जखमी झाली. नुकसानीबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह काही वेळातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. धांदरफळ बुद्रुकसह परिसरात व तालुक्याच्या आणखी काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची धांदल उडाली. धांदरफळ येथील भास्कर आल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडून भिंत पडून मोठं नुकसान झाले. या वेळी घरात सहा महिन्याचे एक आणि एका वर्षाचे एक बाळ झोळीत झोपले होते. सुदैवाने त्यांना दुःखापत झाली नाही. सध्या हे कुटुंब उघड्यावर असून घराचे मोठे नुकसान झाले आहे.

या परिसरातच डेरेवाडी येथे संजय शिवाजी साबळे यांच्या घराचे व गोठ्याचे पत्रे वादळी पावसामुळे उडाले. यात एक मुलगी जखमी झाली असून तिच्या डोक्याला मार लागला आहे. खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या घराचा तातडीने पंचनामा करून योग्य ती मदत ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच उद्या तातडीने घराचे छत झाकण्याचे काम सुरू केले जाणार असून त्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, उद्योजक बाळासाहेब भास्करराव देशमाने यांच्या वतीने नुकसानग्रस्त घरांच्या दुरुस्तीसाठी स्वदेश सेवाभावी संस्थेतर्फे मदत केली जाणार आहे. शासनानेही मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT