Acid Attack Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Acid Attack: संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण अद्याप उघडकीस नाही; तीन महिन्यांनंतरही आरोपी फरार

वडगाव पान येथील विद्यार्थिनीवरील ॲसिड हल्ल्याचा तपास रखडला; भोंदू गडगे प्रकरणातील फरार आरोपीही अद्याप हाती नाहीत, पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: तालुक्यात वडगाव पान येथील मुलीवरील ॲसिड हल्ला तर भोंदू गडगेचे तिघे साथीदार अद्यापही फरार असून तालुका पोलिसांचा तपास सुरु आहे. तपासाला यश न आल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त होत असून ॲसिड हल्ल्यातील कुटुंबीय तीन महिन्यानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून गुह्यातील संशयितांचा तपास लागत नसल्याने पोलिसांची कामगिरी संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे.

वडगाव पान येथे एक मुलगी शाळेतून घरी जात असताना दि. १७ मार्च रोजी अज्ञात माथेफिरूने तिच्या अंगावर ॲसिड फेकल्याची घटना घडली. जिल्ह्यासह राज्यातही या घटनेचा निषेध करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तपासाला गती देत गुन्हेगाराला कडक शासन करण्याचे आश्वासन दिले. गुन्हेगाराला पकडण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, अद्याप आरोपीचा कुठलाही तपास लागलेला नाही. पोलिसांकडून अद्याप तपास सुरू असून लवकरच आरोपी सापडेल, असे आश्वासन देतात.

मात्र, अद्याप गुन्ह्याचा तपास लागत नाही, कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ॲसिड हल्ल्याच्या घटनेला अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. तालुका, जिल्हा व राज्य शासनापर्यंत सर्वच यंत्रणा चर्चेचा विषय झाल्या आहेत. ॲसिड हल्ल्या सारख्या गंभीर घटनेतील आरोपी अद्यापही हाती न लागणे हे राज्य शासनाचे अपयश आहे. मात्र, याबाबत कोणीही आवाज उठवत नाही.

तर दुसऱ्या घटनेत भोंदू गडगेचे तीन तर यातील अन्य तिघे अद्याप फरार आहे. त्या घटनेलाही दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांचाही कुठलाही तपास पोलिसांना लागलेला नाही. भोंदू गडगेला जामीन मंजूर झाला असून अन्य तिघे अटकपूर्वक जामीनासाठी प्रयत्न करत होते. मात्र, संगमनेर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.

त्यामुळे न्यायालयासमोर शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय नाही. आरोपी मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहे. वडगाव पान येथील ॲसिड हल्ल्यातील आरोपी सापडत नसल्याने नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला आहे. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या कामी लक्ष घालून सदर मुलीच्या कुटुंबियाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT