नगर: फ्लॅट खरेदीसाठी अॅग्रीमेंट करून अॅडव्हान्स बुकिंगचे पैसे घेतल्यानंतर न फ्लॅट दिला ना पैसे परत केले, अशा प्रकारे आर्थिक फायद्यासाठी एका निवृत्त कर्नलची १३ लाख ९२ हजार ६२५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १३ मे २०१३ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश वामन गिरी (रा. कोथरूड, पुणे), दिलीप प्रेमराज चंडक (रा. आदर्शनगर, बेळगाव, कर्नाटक), सुशिल हनुमानदास सारडा (रा. सारडा लेन, अहिल्यानगर), सुयश रविंद्र लुणावत (रा. आयसीएस कॉलनी, भोसले नगर, पुणे) असे संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत सेवानिवृत्त कर्नल भोम प्रकाश दुबे (रा. सारसनगर, ता. जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. एल.एस.व्ही.एस डेव्हलपर्स या कंपनीच्या आरोपी संचालकांनी फिर्यादी दुबे यांच्याकडून फ्लॅट खरेदी करण्याकरिता अॅग्रीमेंट करून बुकिंगपोटी एकूण १३ लाख ९२ हजार ६२५ रुपये घेतले होते.
मात्र, ठरल्याप्रमाणे फ्लॅट न देता आणि घेतलेली रक्कम परत न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विश्वासघात करून फसवणूक केली. फिर्यादीने दिलेल्या अर्जाच्या चौकशीवरून १८ सप्टेंबर २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहेत.