Rajendra Gadge Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Fake Godman Fraud: संगमनेरमध्ये भोंदूबाबा राजेंद्र गडगेचा पर्दाफाश

अघोरी उपचार व दैवी शक्तीचा दावा करत भक्तांची आर्थिक फसवणूक; अंनिसच्या तक्रारीनंतर अटक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी क्षीरसागर

संगमनेर: वडगाव पान येथील राजेंद्र गडगे हा पूर्वी गवंडी काम करत होता. पाणी साठवण्याच्या सिमेंट टाक्या तो बनवून देत होता. मात्र हे काम कष्टदायक असल्याने त्याने भोंदूगिरीचा मार्ग निवडला. गत 13 वर्षापासून तो दैवी शक्ती असल्याचे भासवत अघोरी उपचार करतानाच भक्तांचे आर्थिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

बुवाबाजीतून वडगावपान येथे त्याने मोठे साम्राज्य उभे केले. दत्तधाम नावाचा यु ट्युब चॅनलही त्याने सुरू केला. या माध्यमातून त्याची व्याप्ती राज्यभर पसरली. कर्करोगा सारख्या दुर्धंर आजारही बरे करून देतो, असा दावा तो करत होता. इतकेच काय तर मुलबाळ नसणाऱ्या महिलांना मुल देतो, मंत्राद्वारे घरातील समस्या दूर करतो असे सांगत तो अकरा हजारापासून ते एक्कावन्न हजार रुपयांच्या देणग्या उकळत होता. यु ट्युब चॅनलच्या माध्यमातून महती पसरलेल्या या भोंदूकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

दत्ताधाम सरकार नावाने आश्रम सुरू करत तेथून त्याने भोंदूगिरी सुरू केली. दैवी शक्तीच्या जोरावर अनेक आजार बरे करून देतो, असे सांगून तो आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत्या, पण पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. अंनिसच्या ॲड. गवांदे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांना गुन्ह्याची नोंद करावी लागली.

ॲड. रंजना गवांदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी भोंदू राजेंद्र गडगे, त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत भोंदू गडगे व मधुकर शिंदे या दोघांना अटक केली.

पालापाचोळ्याच्या औषधातून आर्थिक शोषण

भोंदू गडगे हा भक्तांना पालपाचोळ्याचे औषध बनवून देत होता. या औषधाचे तो हजारपासून ते लाखापर्यंत आर्थिक शोषण करत होता. या औषधामुळे अनेकांना शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी अंनिसकडे आल्या होत्या. दहा वर्षात त्याने मोठे साम्राज्य उभे केले. पोलिस अटक करण्यास गेले असता तेथील काहींनी विरोध करत पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी तो विरोध मोडून काढत त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT