Kharif Crops Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Rain Deficit Kharif Crops: पावसाने पाठ फिरवताच संगमनेर-श्रीरामपूरमध्ये खरीप संकटात; सुकणारी पिके वाचवण्यासाठी आवर्तनाची मागणी

संगमनेरमध्ये १०४ टक्के पेरणीनंतरही पिकांना पाण्याची टंचाई; श्रीरामपूरमध्ये सोयाबीन, कापूस, मका जळू लागल्याने भंडारदरा कालव्याचे आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यात १०४ टक्के पेरण्या झाल्या असून सरासरी ६१ हजार २२४ हेक्टरवर लागवड झाली. मात्र आता पावसाने उघडीत दिल्याने पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. यंदा सोयाबीन, मका व चारा पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. बाजरी, कापूस व कडधान्याचे क्षेत्र घटले असून भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. पाऊस नसल्याने आता शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. पावसाच्या पाण्यावर तालुक्यातील अनेक शेतकरी अवलंबून असून पावसाळ्यात पठार भागातील बहुतांशी गावात पेरण्या केल्या जातात. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने पेरणीही उशीरा झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्याच्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात आठ ते दहा दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण निर्माण होते. जुलैअखेर १६९.६ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला.

बदलत्या हवामानाच्या व पावसाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला, चारा पिकांवर शेतकरी भर देत आहे. मात्र आता पठार भागात व काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता भासत आहे. आजही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या तालुक्यात अनेक भागात मध्यम स्वरूपाचा अधून-मधून पाऊस पडत आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषता पठार भागात व नदीकाठचा परिसर वगळता सर्वत्र पावसाची आवश्यकता आहे. पावसाअभावी आता चिंतेचे वातावरण पसरले आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली असून येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.

पिके वाया जाण्यापूर्वी आवर्तन सोडा: लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी

पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, मूग, मका ही सर्वच पिके जळून चालली आहेत. त्यामुळे भंडारदरा उजव्या कालव्याचे तातडीने आवर्तन सोडा व पिके वाचवा, असे साकडे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना घातले आहे. तालुक्यातील भेर्डापूर, मालुंजा, लाडगाव, वांगी, खिर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे.

महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. जूनमध्ये झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. सध्या ही पिके पावसाअभावी जळून चालली आहेत. प्रवरा नदी महिनाभरापासून दुथडी भरून वाहत आहे. टाकळीभान टेलटॅंकसह गावोगावची तळी भरली आहेत. जायकवाडी जलाशयही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे आवर्तन सोडून पिके वाचवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिकांची बिकट अवस्था

फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनची फुले गळून पडत आहे. कापूस, मूग, तूर, बाजरी, मका पिकांची अवस्था बिकट झाली आहे. तातडीने पाणी मिळाले नाही तर ही पिके वाया जातील व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

संगमनेर तालुक्यात बहुतांशी भागात पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने आता पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विशेषता पठार भागात व नदीकाठचा परिसर वगळता इतर सर्वत्रच पावसाची प्रतीक्षा आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
रेजा बोडके, तालुका कृषी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT