नगर : नगर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात दुपारपर्यंत संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या 24 तासांत सरासरी 5.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी वादळी वार्यासह झालेल्या पावसाने कर्जत, जामखेड व अकोले तालुक्यांतील 14 गावांतील 88.40 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 174 शेतकर्यांना बसला आहे. (Ahilyanagar News Update)
गुरुवारी कर्जत तालुक्यात 12.3, जामखेडमध्ये 12.1, श्रीगोंदा तालुक्यात 10.9 तर अहिल्यानगर तालुक्यात 8.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खर्डा, वालवड, आढळा, रुईछत्तीशी, भानगाव, टाकळी आदी महसूल मंडलांत सरासरी 30 मि.मी.पाऊस झाला आहे. या पावसाने 14 गावांना फटका बसला आहे. कर्जत तालुक्यातील 9 गावांतील 111 शेतकर्यांच्या 58 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, डाळिंब, आंबा, पेरु आणि केळी आदींचे नुकसान झाले आहे.
जामखेड तालुक्यातील दोन गावांतील 25.15 हेक्टर क्षेत्रावरील कांदा व लिंबूचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 37 शेतकर्यांना बसला आहे. अकोले तालुक्याला देखील वादळी वार्याने काहीसा फटका दिला आहे. या तालुक्यातील तीन गावांतील 26 शेतकर्यांच्या 5.20 हेक्टरवरील बाजरी, टोमॅटो, कोथिंबीर व मकाचे नुकसान झाले आहे. या तीनही तालुक्यातील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.
शुक्रवारी (दि.23) अहिल्यानगर शहर आणि परिसरात दिवसभर सूर्यदर्शनच झाले नाही. पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरु होती. ही संततधार दुपारपर्यंत सुरु होती. त्यामुळे रस्ते जलमय झाले असून, सकल भागांत पाणी साचले आहे.