Liquor Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Jail Liquor Smuggling: राहुरी उपकारागृहात जेवणातून दारूची तस्करी; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

कैद्यांच्या आहार डब्यांमध्ये दारू आढळल्याने खळबळ; पुरवठादारावर गुन्हा दाखल, चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: राहुरी येथील उपकारागृहात कैद्यांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या माध्यमातून दारू पोहोचविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने कारागृह प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी:

न्यायालयीन कोठडीतील कैद्यांसाठी शनिवारी (दि. 30 मे) आहार पुरवठादाराचा प्रतिनिधी किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ (रा. मुलनमाथा, राहुरी) जेवण घेऊन आला. त्याच्याकडील डब्यांची नियमित तपासणी सुरू असताना पोलिस हवालदार रामनाथ सानप यांना संशय आला.

त्यांनी उपकारागृह अधीक्षक रामचंद्र पांडुरंग खामकर यांना माहिती दिली. त्या वेळी केलेल्या तपासणीत कैद्यांना देण्यास मनाई असलेले पदार्थ डब्यांमध्ये आढळून आले. त्याहून गंभीर बाब म्हणजे कैद्यांसाठी आणलेल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारू असल्याचे निदर्शनास आल्याने अधिकारीही चक्रावून गेले.

या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारागृहात प्रतिबंधित वस्तू पोहोचविण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला की यापूर्वीही अशा मार्गाने प्रतिबंधित वस्तू आत पोहोचल्या होत्या? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. उपकारागृह अधीक्षक रामचंद्र खामकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तुळशीदास गिते तपास करीत आहेत. संबंधित आहार पुरवठा व्यवस्थेबाबत कारागृह प्रशासनाकडे अहवालही पाठविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT