तनपुरेंच्या नेतृत्वाखाली संतप्त राहुरीकर पुन्हा रस्त्यावर; आंदोलनात पोलिसांची झाडाझडती pudhari
अहिल्यानगर

Rahuri News: तनपुरेंच्या नेतृत्वाखाली संतप्त राहुरीकर पुन्हा रस्त्यावर; आंदोलनात पोलिसांची झाडाझडती

महामार्ग की, मृत्यूचा सापळा?

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: राहुरी शहरातून अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही, अगदी बिनदिक्कतपणे काही अवजड वाहने वाहतूक कराताना पाहून, शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर धाव घेवून, आंदोलन केले.

दरम्यान, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, या महामार्गावरील अवजड वाहतुकीबाबत पोलिस प्रशासनाचा बेबनाव उघड केला. रक्कम घेऊन, अवजड वाहने खुलीआम सोडली जातात, अशी कबुली स्वतः एका वाहन चालकाने दिली. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, अवजड वाहनांच्या वाहतूक बंदीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत, प्रशासनाचे लक्ष वेधले. (Latest Ahilyanagar News)

तरुणांसह माजी मंत्री तनपुरे यांनी महात्मा फुले चौकात अवजड वाहतूक रोखूण प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र निषेध नोंदविला. यावेळी महामार्गावर ट्रकांची लांबच- लांब रांग लागली होती.

अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. अवजड वाहनांच्या बेछूट वाहतुकीमुळे गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या भीषण अपघातांमध्ये तब्बल आठ निष्पप प्रवाशांचे बळी गेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन पेटले आहे.

गेल्या आठवड्यात मृतदेह थेट रस्त्यावर ठेवून, रास्तारोको करण्यात आला होता. यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी, अवजड वाहनांना बाह्यवळणमार्गाने वळविण्याचे आदेश दिले, मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी चालकांकडून 20 ते 500 रुपये घेवून, अवजड ट्रकांना पुन्हा महामार्गावर सोडले जात आहे, असा आरोप आंदोलनकर्त्या तरुणांनी केला.

या आंदोलनात रविंद्र आहेर, सागर तनपुरे, कांता तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, महेश उदावंत, रविंद्र तनपुरे, रवी गुप्ता, पिनू काळे, शुभम डफळ, आतिश हरेल, राजेंद्र आहेर, ऋषिकेश बारस्कर, शरद शेंडे, परवेज बागवान यांच्यासह शेकडो तरुण सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने यांनी, महामार्गावरील खड्ड्यात बसून, अनोख्या पद्धतीने पोलिसांचा निषेध नोंदविला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी, घटनास्थळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

अवजड वाहन चालकांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्य रस्त्यावर अवजड वाहतूक कशी आली, याचा तपास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील ट्रॅफिक जाम झाली होता. यादरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशियादेखील वाहतूक कोंडीत अडकले होते, मात्र आंदोलनकर्त्यांनी त्यांना, वाट मोकळी करून दिल्यामुळे आंदोलन संयमित व शिस्तबद्ध असल्याचे दिसले.

‌‘प्रवाशांचा जीव अवघा 20 रुपयांचा झाला आहे का?‌’

माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, आंदोलनस्थळी धाव घेताच, एका ट्रका चालकाने सत्य उघड केले की, ‌‘20 रुपये घेऊन मला पोलिसांनी सोडले. यावर संताप व्यक्त करीत तनपुरे म्हणाले की, प्रवाशांचा जीव अवघा 20 रुपयांचा झाला आहे का? पोलिस प्रशासन इतके बेफिकीर झाले आहे का? उद्यापर्यंत अवजड वाहतूक पूर्णतः न थांबल्यास, आणखी मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला.

गेल्या पंधरा दिवसातील अपघातांचा धावता आढावा

राहुरी फाटा येथे ट्रकने (दि. 4 सप्टेंबर) रोजी दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. (दि. 7) रोजी सोनई फाट्याजवळ भरधाव ट्रकखाली येऊन, एक कामगार ठार झाला. (दि. 10) रोजी देवळाली प्रवरा येथे अवजड कंटेनरच्या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले. (दि. 13) रोजी राहुरीतील महात्मा फुले चौकात ट्रकने चिरडून एका वृद्धाचा मृत्यू झाला.

(दि. 15) रोजी चांदेकसारे येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांम्प्त्यावर भरधाव ट्रक धडकल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. (दि. 16) रोजी लहान मुलाला कंटेनरने चिरडले. अशा एकूण 8 निष्पाप प्रवाशांना नाहक प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, याशिवाय तब्बल डझनभर प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT