

कर्जत: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आम सभेमध्ये सर्वांत जास्त वेळ चर्चा होऊन नुकसानीचे पंचनामे करा. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून सरकारच्या मानगुटीवर बसून नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन आ. रोहित पवार यांनी या वेळी दिले.
आ. पवार यांच्या पुढाकाराने कर्जतमध्ये आयोजित आमसभेत तालुक्यातील नागरिकांनी सर्वच शासकीय विभागातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. संतप्त झालेल्या आ. पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, कधी समजून सांगत तर कधी कारवाईचा धाक दाखवत नागरिकांच्या अडचणी सोडवल्या. (Latest Ahilyanagar News)
या आमसभेत आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, कृषी, महसूल, पाणीपुरवठा, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, घरकुल योजना, समाजकल्याण, तसेच अन्न व नागरी पुरवठा विभाग आदी सर्व शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या आमसभेला तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, पंचायत समिती सदस्य यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, तसेच नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
या वेळी नागरिकांनी मांडलेल्या अडचणींवर आ. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून हे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तत्काळ भरपाई देणे, पंचनामे करण्यातून कोणताही शेतकरी वगळण्यात येऊ नये असे आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कुकडी व सीना प्रकल्पाच्या काठावरील चाळण झालेल्या जमिनींची समस्या सोडवणे, शेतीसंबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करणे, घरकुल योजना व रेशन कार्ड, पोलिस विभागाकडील तक्रारी, भूमी अभिलेख विभागाबाबतच्या तक्रारी, घरकुल, रस्ते, वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची होणारी अडवणूक, त्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी या वेळी केल्या.
दरम्यान, सन 2024-25मधील पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला. सन 2025-26साठी नवे विकास आराखडे निश्चित करण्यात आले. यामध्ये पायाभूत सुविधा उभारणी, ग्रामविकास प्रकल्प, शेतीसंबंधित उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा सुधारणा यांना प्राधान्य देण्यात आले.
टाळ्या वाजवून आ. पवारांचे अभिनंदन
अधिकारी तक्रार करणाऱ्या नागरिकालाच दरडावत होता. त्या अधिकाऱ्याला त्याच्या अधिकाराची जाणीव करून देत सामान्य नागरिकावर अशा प्रकारे तुम्ही बोलू शकत नाही, अशा शब्दांत आ. रोहित पवार यांनी त्याला झापले. आमदारांचा रुद्रावतार बघून संबंधित अधिकारी लगेच नरमल्याचे यावेळी दिसून आले. या वेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून आ. पवार यांचे अभिनंदन केले.
अजित पवारांची झलक
रोहित पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. आजच्या आमसभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व अधिकारी यांच्यामध्ये संवाद साधताना बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झलक दिसली. त्यांनी कधी अधिकाऱ्यांना खडसावले, तर कधी प्रश्न उपस्थित करणारा कार्यकर्ता जर वेगळ्या पद्धतीने बोलत असेल तर त्यालाही खडे बोल सुनावले. याचवेळी अधिकाऱ्यांना माझा पक्षाचा कार्यकर्ता जरी असेल तरी चुकीचे काम करीत असल्यास त्याच्यावरही कारवाई करा, असे सांगत त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय होऊ देणार नाही, असे कृतीमधून दाखवले.