नगर: अनुसूचित जमातीत समावेश करुन आरक्षणाचा लाभ अनुसूचित जमाती प्रवर्गातून मिळावा, या मागणीसाठी नंदीवाले तिरमली समाजाने नंदीबैलासह गुरुवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आरक्षण मागणीच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणला होता.
जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तिरमली समाजाच्या मोर्चास प्रारंभ झाला. मोटारसायकल रॅली काढून महापालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा धडकला. (Latest Ahilyanagar News)
महाराष्ट्रातील तिरमली नंदीवाले समाजास हैदराबाद, सातारा गॅझेटनुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366 (खंड 25) व अनुच्छेद 342 नुसार अनुसूचित जमाती किंवा आदिम जमातीचा दर्जा प्राप्त आहे. 1950 मध्ये पहिला आदेश काढण्यात आला.
त्यांनतर 1956 व 1960 मध्ये सुधारणा करण्यात आली. 27 जुलै 1977 पासून अनुसूचित जाती-जमाती आदेश (सुधारणा) अधिनियम 1976 अस्तित्वात आला. या अधिनियमानुसार क्षेत्र बंधन दूर झाल्यामुळे तिरमली नंदीवाले समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळणे अपेक्षित असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात छावा संघटनेचे कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाळू विशे, प्रवीण कानवडे, प्रदीप औटी, अजय शेळके, विनोद साळवे, योगेश खेंडके, महेश काळे, अजित शिंदे, बाबूराव फुलमाळी, भीमा औटी, विष्णू पवार, गणेश गुंडाळे, उत्तम फुलमाळी, भानुदास फुलमाळी, दीपक औटी, रावसाहेब फुलमाळी, सुरेश औटी, रामा आव्हाड, लिंबाजी देशमुख, अण्णा फुलमाळी, आदिनाथ ओनारसे, बाळू औटी, गुलाब काकडे सहभागी झाले होते.