राहुरी पोलिस ठाण्यात महिलांची झुंज Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Police Station Fight: राहुरी पोलिस ठाण्यात महिलांची झुंज; पोलिस दादांसमोरच ठाणे बनले रणांगण!

तक्रारीदरम्यान महिलांचा वाद पेटला; झापडांचा वर्षाव, काच फोडली, एक सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सहभागी

पुढारी वृत्तसेवा

राहुरी : पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलांचा वाद असा पेटला की पाहता पाहता पोलिस ठाणेच रणांगण बनले. उपस्थित पोलिस दादांपुढेच महिलांनी एकमेकींना झापडांचा वर्षाव करत अक्षरशः झुंज जुंपली. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि आरडाओरडा यामुळे काही काळ राहुरी पोलिस ठाण्यात गोंधळ माजला. या झुंजीत पोलिस अधिकाऱ्यांच्या कॅबिनची काच फुटली असून, सर्वात धक्कादायक म्हणजे हाणामारी करणाऱ्यांपैकी एक महिला सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक असल्याचे समोर आले आहे!(Latest Ahilyanagar News)

राहुरी पोलिस ठाण्यात काल (दि. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास सहाय्यक फौजदार तुळशिराम गिते यांच्या उपस्थितीत दोन गटांमधील वाद मिटविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. एका बाजूला स्वीटी शेखर साळवे व त्यांची आई शीतल विलास भालेराव (रा. मुंजोबानगर, राहुरी) या होत्या, तर दुसऱ्या बाजूला अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपी उषाराणी समीर सूर्यवंशी व मयुरी मयूर सूर्यवंशी (रा. बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) या दोघी उपस्थित होत्या.

सुरुवातीला चर्चेचा सूर सौम्य होता; मात्र काही क्षणातच वादाच्या ठिणग्या पेटल्या. दोन्ही गटांतील महिलांमध्ये ‌‘तूच चुकीची‌’ अशा शब्दयुद्धातून थेट हातघाई झाली. महिलांनी एकमेकींचे केस ओढत, झापडा, लाथाबुक्क्‌‍यांचा पाऊस पाडत थेट पोलिस दादांपुढेच मारामारी केली. क्षणात पोलिस ठाण्यात आरडाओरडा, किंचाळ्या आणि वस्तूंची तोडफोड सुरू झाली. यामध्ये सहाय्यक फौजदारांच्या कॅबिनची काच फुटली. अचानक झालेला हा गोंधळ पाहून पोलिस कर्मचारी आणि उपस्थित नागरिक काही काळ स्तब्ध झाले. त्यानंतर पोलिस कर्मचारी अंजली गुरवे, वृषाली कुसळकर, सूरज गायकवाड, राहुल यादव, राजू जाधव यांनी तत्परतेने हस्तक्षेप करत महिलांना बाजूला केले. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते दीपक साळवे, निलेश जगधने आणि प्रवीण धनवडे यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली.

झुंजीदरम्यान काही महिला किरकोळ जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, पोलिस ठाण्यातच झालेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि सरकारी संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित चारही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या हाणामारीत सहभागी झालेल्या एका महिलेला सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक म्हणून ओळखले जात असल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण राहुरी परिसरात चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT