राहुरी: तालुक्यातील राहुरी खुर्द येथील भरवस्ती मधील स्वस्त धान्य दुकानावर अज्ञात चोरट्यांनी धान्य चोरी करून नेल्याची घटना काल शनिवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी तब्बल साडेअकरा क्विंटल गहू, एक क्विंटल तांदूळ तसेच एक टेबल फॅन, असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
राहुरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील भागात काळुबाई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान चालविण्यात येते. या दुकानाची जबाबदारी सोमनाथ पागीरे यांच्याकडे आहे. काल शनिवारी सकाळी त्यांच्या मातोश्री नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या असता, दुकानाच्या दरवाज्याची कडी-कोंयडा तोडलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची माहिती सोमनाथ पागीरे यांना दिली.
घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पागीरे यांनी दुकानाचे कुलूप व दरवाज्याची कडी-कोंयडा तोडून आत प्रवेश केल्याचे पाहिले. दुकानातील साहित्याची पाहणी केली असता गहू, तांदूळ आणि टेबल फॅन चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने तब्बल ११.५० क्विंटल गहू, एक क्विंटल तांदूळ आणि एक टेबल फॅन, असा ऐवज घेऊन पोबारा केल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी तालुका पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार, ग्राम महसूल अधिकारी तुषार काळे तसेच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट व हवालदार अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन दारकुंडे करीत आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, चोरीचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अहिल्यानगर येथून ठसे तज्ज्ञांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण केले होते. घटनास्थळावरील पुरावे संकलित केले असून चोरट्यांचा लवकरच मागोवा लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.